Sat. Sep 18th, 2021

नीरव मोदीला लगेच भारतात आणू शकत नाही – परराष्ट्र मंत्रालय

भारतातील पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला नीरव मोदी कॅमेऱ्यात कैद झाला असल्याने पुन्हा एकदा त्याच्या प्रत्यार्पणाची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने नीरव मोदीला भारतात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरु असल्याची माहिती दिली आहे.

नीरव मोदी लंडनमध्ये असल्याची आधीपासूनच कल्पना आहे. तो तिथे असल्याची माहिती असल्यानेच प्रत्यार्पणाची विनंती केली होती. त्यामुळे आता तो कॅमेऱ्यात दिसला म्हणून लगेचच त्याला भारतात आणू शकतो असे होत नाही असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले रवीश कुमार ?

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ‘विजय मल्ल्याला आणण्यासाठी जितका प्रयत्न करत आहोत तितकाच प्रयत्न नीरव मोदीला आणण्यासाठी केला जात आहे.

प्रत्यार्पणासाठी गरज असणारी सर्व कागदपत्रं बिटन सरकारकडे सोपवण्यात आली असून त्यांनी कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केलेली नाही.

त्यामुळे सध्या आम्ही फक्त त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत’.

पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला आरोपी नीरव मोदी लंडनमध्ये असून एकदम ऐशो आरामात जगत आहे.

वेस्ट एंड येथील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये नीरव मोदी वास्तव्य करत आहे. द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, नीरव मोदीने लंडनमध्ये हिऱ्यांचा नवा व्यवसाय सुरु केला आहे.

नीरव मोदीला आम्ही शोधले असून तो वेस्ट एन्ड लंडनमध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचेही टेलिग्राफने म्हटले आहे.

यासोबत नीरव मोदीचा व्हिडीओही जारी करण्यात आला असून तो अत्यंत बिनधास्तपणे लंडनमधील रस्त्यांवर फिरताना दिसत आहे.

व्हिडीओत नीरव मोदीने एक जॅकेट घातलेलं दिसत आहे.

या जॅकेटची किंमत कमीत कमी दहा हजार पाऊंड म्हणजेत नऊ लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

जवळपास दोन मिनिटांच्या व्हिडीओत पत्रकार वारंवार नीरव मोदीला प्रश्न विचारत त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांसंबंधी विचारणा करत आहे.

मात्र नीरव मोदी कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नाही. दरवेळी नीरव मोदी ‘नो कमेंट्स’ इतकीच प्रतीक्रिया देतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *