Sat. Apr 4th, 2020

अजितदादा, इतकी वर्षं आपण उगाच दूर राहिलो- उद्धव ठाकरे

“अजितदादा, इतकी वर्षं आपण उगाच दूर राहिलो. मधली वर्षं आपण उगाच वाया घालवली. आपण आधीच एकत्र यायला हवं होतं” असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावरून मनोगत व्यक्त करताना केलं. या विधानाद्वारे भाजपला अप्रत्यक्ष टोला ठाकरेंनी लगावला आहे. ‘पहिल्यांदाच तिन्ही पक्ष एकसाथ आले आहेत. आता चांगलं काम करून दाखवल्याशिवाय राहणार नाही’, असाही विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय.

‘हे लोकांचं सरकार’

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच शिवनेरीवर आले. यावेळी शिवछत्रपतींना अभिवादन करून त्यांनी शिवप्रेमींशी संवाद साधला. या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरी व अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते.  

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी यापूर्वीच युती करायला हवी होती, अशी खंत व्यक्त केली. या वक्तव्याद्वारे भाजपला मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला. आताचं सरकार हे जनतेचं सरकार आहे. हे आपलं सरकार आहे, अशी भावना गोरगरीबांच्या मनात निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असं ते म्हणाले.

शिवनेरी सुशोभीकरणासाठी 23 कोटी

शिवनेरी किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी 23 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं. तसंच शिवनेरीवरील गर्दी पाहता महाराष्ट्रात आता रयतेचं राज्य आल्याचं स्पष्ट होतंय, असंही अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *