केंद्रीय मंत्री वी मुरलीधरन यांच्या गाडीवर हल्ला

कोलकाता: परराष्ट्र राज्यमंत्री वी मुरलधीरन यांच्या ताफ्यावर पश्चिम मिदनापुरात लाठी आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री बंगालमध्ये ताफ्यासह गेले होते. हा हल्ला तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप वी मुरलीधरन यांनी केला आहे. गाडीवर हल्ला करतानाचा व्हिडिओ मुरलीधरन यांनी ट्विटरवर शेअर करत या हल्ल्याची माहिती दिली.

‘तृणमूलच्या कार्यकर्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात गाडीच्या खिडक्या तोडल्या. तसेच कर्मचाऱ्यांवरही हल्ला करण्यात आला आहे’, असं वी मुरलीधरन यांनी ट्विट करत म्हटलं आहे. मुरलीधरन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत काही नागरिक टोळीने हातात काठ्यांनी हल्ला करत आहेत. तसेच त्यांच्या गाडीवर दगडफेक करत असल्याचं दिसत आहे. या हल्ल्यात एक व्यक्ती मंत्र्यांच्या गाडीची काच काठीने फोडली. दुर्दैवाने यामध्ये चालक जखमी झाला आहे.

केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांनी सांगितले की, जेव्हा पश्चिम मिदनापूरमध्ये पोहोचलो तेव्हा तेथील टोळीने गाडीच्या ताफ्यावर काठ्या आणि दगडांनी हल्ला केला. ज्या गाडीमध्ये केंद्रीय मंत्री बसले होते त्या गाडीची काच तोडण्यात आली. हा हल्ला तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री वी मुरलीधरन यांनी केला आहे.

Exit mobile version