Tue. May 17th, 2022

‘राज्यात चाललंय तरी काय?’ – देवेंद्र फडणवीस

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. मात्र, ठिय्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी बावनकुळे यांना ताब्यात घेतले. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले की, ‘अजब न्याय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा ज्यांनी केली, त्यांच्यावर काहीच कारवाई नाही आणि या अराजकतेवर कारवाईची मागणी करणाऱ्या भाजपाच्या लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांना जागोजागी ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे या राज्यात चाललंय तरी काय?’ असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे.

कायद्याच्या कितीही चिंधड्या उडवा, वाटेल तसा पोलीस दबाव आणा, मात्र भाजपचा कार्यकर्ता मूग गिळून गप्प बसून सहन करणार नाही, आणि या राज्यातील जनताही तुम्हाला माफ करणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हटले आहेत.

बावनकुळेंचे ठिय्या आंदोलन

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर ग्रामीणमधील कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी जे नियमात असेल ते करावे मात्र नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.