Tue. Aug 9th, 2022

‘पवार जे बोलतात त्याच्या नेमकं उलटं घडतं’

महाराष्ट्रात शिंदे सरकार आले असून शिवसेना आणि भाजपा यांची युती झाली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं. शिंदे सरकार पाच ते सहा महिने टिकाणार असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्यावर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी करत मविआवर निशाणा साधला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत स्थैर्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवारांना चिमटा काढला आहे. पवार जे बोलतात त्याच्या नेमकं उलडटं घडतं, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच राज्यात भाजपा-शिवसेना सरकार कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

सोमवारी पार पडलेल्या बहुमत चाचणी प्रस्तावात शिंदे-भाजपा गट १६४ मतांनी विजयी झाला आहे. तर महाविकास आघाडीला ९९ मते मिळाली असून मविआचा पराभव झाला. तसेच बहुमत चाचणीत ३ आमदारांनी तटस्थ भुमिका घेतली. त्यामुळे शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर, लोकांना हे हवं असलेलं सरकार असून पुढील अडीच वर्ष आमचं सरकार स्थिर राहणार आहे. महाराष्ट्रात नवे मंत्रिमंडळ लवकरच जाहीर होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

राज्यातील सत्तासंघर्षाचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनात दिसून आले. विधिमंडळातील शिवसेना पक्षाचे कार्यालय सील करण्यात आले होते. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मी शिवसेनेचे विधिमंडळातील कार्यालय उघडायला सांगितले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.