Sat. Jul 2nd, 2022

गव्याच्या मृत्यूनंतर आपण काय शिकलो

लोकसंख्या वाढली की शहर वाढतात अन् सहाजिकच त्यामुळे घराचे प्रमाणही वाढते. पुणे शहर सर्वाना आपलंस वाटणारं. पुण्याला जसा ऐतिहासिक वारसा आहे तसा नैसर्गिक वारसाही आहे. त्यामुळे या भागात पक्षी, प्राणी असणारच. पुण्यात गेल्या वर्षी ९ डिसेंबर २०२० दिवस मोठा नसला तरी याच दिशवी कोणालाही जास्त माहिती नसणारा एक प्राणी रानगवा चुकून जंगलाचा भाग विसरला अन् इमारतीच्या जंगलात आला. मला तो दिवस आठवतो त्यादिवशी सकाळी कोथरूड परिसरातील महात्मा सोसायटीमध्ये कोणाला तरी हा रानगवा दिसला. त्यानंतर त्याचे फोटो वायरल झाले. अन् त्याला पकडण्यासाठी धावाधाव सुरू झाली. शहरात रानगवा आला हे कळताच वनविभाग, वाहतूक पोलीस नागरिक, माध्यमे सगळी पोहचली.

शहरात रानगवा अनेक जणांनी पहिल्यांदाच पाहिला असावा. रेड्यासारखा असणारा हा रानगवा जवळपास एक ते दीड तास कोथरुडमधील सोसायटीच्या रस्त्यावर पळत होता. त्याला पकडण्यासाठी वनविभाग तसेच नागरिकांना हटवण्यासाठी पोलीसांची धावाधाव सुरू होती. अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांना धडका देत रानगवा मात्र सैरभैर पळत होता. अखेर काही वेळानंतर एका घराच्या दरवाज्याला त्याने जोराची धडक दिली अन् तिकडेच कोसळला. तोच कधीच न उठण्यासाठी… आणि सगळ्यांची धावपळ थांबली. गर्दी झाली ती तो जिंवत आहे की त्याचा मृत्यू झाला हे पाहण्यासाठी.

वनविभाग त्याच्यावर उपचार करण्यासाठी घेऊन गेले, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. अखेर त्यानंतर एक तासांनी बातमी आली, रानगव्याचा मृत्यू झाला. दिसायला एवढा मोठा असणाऱ्या प्राण्याचा मृत्यू कसा झाला? प्राणीमित्र, वनविभागाने अनेक तर्कवितर्क काढले. पळून पळून किंवा मोठा प्राणी असला तरी तो घाबरला आणि त्यात त्याचा जीव गेला. त्यानंतर प्राणीप्रेमी, अनेक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. पण हळहळ व्यक्त करून गेलेला जीव परत येणार का? धावपळ केली नसती तर काही वेळ शहरात थांबून परत गवा जंगलाकडे गेला असता का? असे अनेक प्रश्न समोर आले.

आपण विकासाच्या नावाखाली जंगलतोड करतो. प्राणी, पक्षांची घरे उध्वस्त करतो. एकच त्यांना बोलता येत नाही म्हणून ना? नाही तर त्यांनी आपल्याकडे जसे आंदोलन, मोर्चे निघतात तसे आंदोलन, मोर्चे काढून निषेध व्यक्त केला असता. पण माणूस प्राणी हा सगळयात वेगळा आहे. त्याला सर्व संवेदना आहेत. आपणच त्यांना समजून घ्यायला हवं.

या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. एका वर्षानंतर पुण्यात कोथरूड परिसरातच प्राणीप्रेमींनी या गव्याची प्रायश्चित सभा आयोजित केली होती. पण काय प्रायश्चित्त केलं आपण एक वर्षात. प्राणी पक्षासाठी आपण काही उपक्रम केले. प्रबोधन काही केलंय का? हे प्रश्न विचारले, तर नाहीच उत्तर येईल. पुण्याच्या आजुबाजूला जास्त नैसर्गिक भाग आहे. या परिसरात रानगवे आहेतच पण त्याच बरोबर सर्वात जास्त बिबट्या पण आहेत. शहरात आताही काही ठिकाणी बिबट्या रात्रीच्या वेळी ये-जा करत असतात. फिरणाऱ्या, झोपेत असणाऱ्या नागरिकांवर हल्ला करत असतात. यामुळे याचा येणाऱ्या काळात धोका आणखी वाढणार आहे. प्राण्यांना पकडून परत जंगलात सोडून देणं किंवा त्यांना मारणं हा पर्याय नाही. त्यामुळे शासनाने, नागरिकांनी यावर विचार करणे गरजेच आहे. नाही तर रानगव्यासारखे अनेक निष्पाप प्राणी मारले जातील अन् आपल्याकडे हळहळ आणि निषेध व्यक करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

– सचिन जाधव, पुणे 

( या मताशी संपादक अथवा प्रकाशन संस्था सहमत असतीलच असे नाही. या लेखात लेखकाने मांडलेली मते स्वतंत्र आहेत. )

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.