Fri. Jan 28th, 2022

कोण आहे गँगस्टर रियाझ भाटी ?

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणासंबंधी सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते यांच्यात आता वेगळ्याच वादाने पेट घेतली आहे. बुधवारच्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी एक नाव घेत फडणवीस यांच्यावर गुन्हेगारी जगताची पाठराखण केल्याचा आरोप केला. हे नाव म्हणजे रियाझ भाटी. नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांचे रियाझ भाटीसोबतचे फोटो दाखवून हा दावा केला आहे.

  यावर भाजपने विद्यमान मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच त्यांचा मुलगा आणि विद्यमान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिवाय विद्यमान परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत रियाझ भाटीचे फोटो शेअर केले. रियाझ भाटीचा एक फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सोबतही दिसत आहे. काही काळापूर्वी हाच फोटो चर्चेत आला, तेव्हाही शरद पवार यांच्या भाटीसोबत असलेल्या संबंधाबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. त्यावेळी, पक्षाने या आक्षेपांना नाकारले होते. त्यामुळे रियाझ भाटीवरून इतके राजकारण सुरू आहे तर तो नेमका आहे तरी कोण?

 रियाज भाटी हा कुख्यात गुंड असून त्याचा दाऊद इब्राहिमच्या टोळीसोबत थेट संबंध आहे. रियाझ भाटीवर खंडणी, जमीन बळकावणे, बनावट कागदपत्रे बनवणे, गोळीबार असे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २०१५ आणि २०२०मध्ये बनावट पासपोर्टवर पळून जाण्याच्या प्रयत्नात रियाझ भाटीला अटक करण्यात आली होती. तसेच परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यात भाटी हा सहआरोपी आहे. भाटीला पोलिसांनी २०१३मध्ये अटक केली होती. तसेच २००६मध्ये मालाडमध्ये जमीन हडप आणि धमकावल्याप्रकरणी रियाझ भाटीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *