Wed. Oct 5th, 2022

राज्यसभा निवडणुकीत एमआयएम कुणाच्या बाजूने?

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारण चांगलच तापलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात जागा सहा आणि उमेदवार सात आहेत. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातील अपक्ष पक्षाला अधिक महत्त्व आले आहे. बहुजन विकास आघाडी आणि समाजवादी पार्टी मविआवर नाराज असल्याची चर्चा जोर धरत आहे. अशातच, एमआयएमनेही अद्याप राज्यसभेच्या निवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही.

राज्यसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, याबाबत अद्याप एमआयएमची भूमिका ठरलेली नाही. याच पार्श्वभूमीवर नांदेड आणि लातूर येथे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेडच्या या सभेत राज्यसभेबाबत एमआयएमची भूमिका ठरणार आहे. त्यामुळे एमआयएम अपक्ष आमदार मविआच्या बाजूने उभे राहतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मविआबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकार निधी वाटपात पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. तसेच राज्यसभेत कोणत्या पक्षाला पाठिंबा करणार याबाबत पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी निर्णय घेणार असल्याचे जलील म्हणाले. त्यामुळे आता असदुद्दीन ओवैसी यांच्या नांदेड येथील सभेला अधिक महत्त्व आलं आहे.

बविआ, सपाचे आमदार मविआवर नाराज

बहुजन विकास आघाडी आणि समाजवादी पार्टीचे आमदार मविआवर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकार बहुजन विकास आघाडीला किंमत देत नाही. मविआकडून समाजवादी पार्टीच्या खच्चीकरणाचे प्रयत्न होत आहेत. तसेच मविआचे नेतृत्व अपक्षांना भेटत नसल्यामुळे बविआ आणि सपाचे आमदार मविआवर नाराज आहेत. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत अपक्षांना घोडा ठरवतात तर मविआमध्ये अपक्ष आमदारांना सन्मान मिळत नसल्याचा आरोपही बविआ आणि सपाच्या नाराज आमदारांनी केला आहे.

येत्या १० जून रोजी राज्यसभा निवडणूक पार पडणार आहे. मात्र, अपक्ष आमदारांनी अद्याप राज्यसभा निवडणुकींबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. तर अपक्ष आमदारांनी नाराजी व्यक्त केली असल्यामुळे आता मविआत तणाव निर्माण झाला असून राज्यसभा निवडणुकीत मविआला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.