Fri. Jul 30th, 2021

धक्कादायक! कोकण किनारपट्टीवरून मासे गायब

गेल्या काही दिवसांपासून समुद्रावरील वाऱ्याचा वेग कमी झाल्यानंतरही मासे मिळत नसल्याने येथील मच्छीमार चिंतेत आहेत.

मात्र नैसर्गिक कारणांबरोबरच मानवनिर्मित कारणेही या परिस्थितीमागे असल्याचे चित्र समोर आले आहे.

बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा गेल्या आठवडय़ात कोकण किनारपट्टीला फटका बसला.

ताशी 40 ते 50 किलोमीटरने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे सलग 4 दिवस मासेमारी बंद ठेवावी लागली.

त्यामुळे सुमारे एक कोटीचे नुकसान सहन करावे लागले.

या आठवडय़ाच्या सुरुवातीपासून वाऱ्याचा वेग मंदावल्याने मासेमारीला पुन्हा सुरुवात झाली, पण समुद्रात फारसे मासेच मिळत नसल्याने मच्छीमार चिंतेत आहेत.

जाणकारांच्या मते, एलईडी दिव्यांच्या तीव्र प्रकाशझोतात अनिर्बंध मासेमारी आणि इतर माशांना पळवून लावणाऱ्या ट्रीगर फिशमुळे मच्छीचा तुटवडा जाणवत आहे.

समुद्रातील बदललेल्या प्रवाहामुळे खोल समुद्रातील या माशांनी राज्याच्या सागरी परिक्षेत्रात येऊन धुमाकूळ घातला. त्यांची चाहूल लागताच अन्य मासे गायब होतात.

त्यामुळे मत्स्योत्पादन घटल्याची माहिती सहायक मत्स्य आयुक्त कार्यालयाने दिली  आहे.

मत्स्योत्पादन घटल्याच्या तक्रारीला दुजोरा देताना येथील सहायक मत्स्य आयुक्त यांनी सांगितले की, उत्पादनामध्ये नेमकी किती घट झाली आहे, हे आकडेवारीनिशी लगेच सांगणे शक्य नसले तरी यांत्रिक नौकाही फार काळ मासेमारी न करता परत येत आहेत.

समुद्रात फार मासे मिळत नसल्याची माहिती त्यांच्याकडून मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *