लोकांना का भडकवताय? – दीपक केसरकर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांच्याबद्दल आम्ही काहीच बोलणार नाही. त्यांच्यावर टीकाही करणार नाही, असं शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांकडून वारंवार सांगितलं जात होतं. मात्र, आता या आमदारांनी शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी तर थेट उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. खासदारांच्या घरावर मोर्चे काढले जात आहेत. त्यांना जाब विचारले जात आहेत. लोकांना का भडकवताय? असा सवाल दीपक केसरकर यांनी केला आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला. त्यामुळे दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सवाल केला आहे. मी तीन प्रश्न विचारले होते. त्यापैकी एकाचेही उत्तर दिलेले नाही. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता. तो त्यांनी पूर्ण केला नाही. केंद्राशी चांगले संबंध राहिले असते तर विकासाला चालना मिळाली असती. पण रोज सकाळी ९ वाजता उठायचे आणि केंद्रावर टीका करायची हेच धोरण राबवलं गेलं. त्यामुळे केंद्राशी संबंध चांगले राहिले नाही, अशी टीका करतानाच गेली अडीच वर्षे राजकारण सुरू होतं. दिल्लीवर आरोप सुरू होते. आता हे राजकारण थांबलं पाहिजे, असं आवाहन दीपक केसरकर यांनी केलं.