Mon. Apr 6th, 2020

#WorldSparrowDay : नन्हीसी चिडियाँ… अंगना में फिर आजा रे…

आपल्या बालपणीच्या दिवसांचा अविभाज्य भाग असणारा पक्षी म्हणजे चिमणी. ‘चिऊताई चिऊताई दार उघड..’ सारखी गोष्ट असो, किंवा  ‘चिवचिव चिमणी…अगं ए चिमणे’ सारखी बालगीतं. घराच्या आंगणात, वळचणीला ‘चिऊ चिऊ’ करणारी चिमणी टिव टिवणाऱ्या twitter च्या जमान्यात विस्मृतीत जाऊ लागलीय. एकेकाळी सकाळ जिच्या चिवचिवाटाने जाग आणायची, ती चिमणी आता सहज नजरेलाही पडेनाशी झालीय. ही चिमणी आता शहरांमधून हरवत चालली आहे. याच चिमणीला 20 मार्च हा दिवस समर्पित आहे… आजचा दिवस हा ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून ओळखला जातो.

का होत आहेत चिमण्या नामशेष?

चिमणी हा पक्षी सहज सर्वत्र आढळणारा असला, तरी आता मात्र चिमणी हरवत चालली आहे.

सध्या चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होताना सर्वेक्षणातून निदर्शनास आलंय.

‘2.0’ सिनेमात पक्ष्यांच्या बचावासाठी सरसावलेल्या ‘पक्षीराजन’ची चिंता चिमण्यांच्या बाबतीत खरी आहे.

शहरांमध्ये मोबाईल टॉवर्समधून विद्युत चुंबकीय किरणांचे उत्सर्जन होत असतं.

हिच चुंबकीय किरणं चिमण्यांसाठी अत्यंत हानीकारक असतात.

यामुळे चिमण्यांचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे.

आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे चिमण्यांना घरट्यांच्या जागांची कमतरता भासते.

अन्नाची कमतरता, शहरांमधील वाढतं प्रदूषण यांचा परिणाम चिमणीच्या अस्तित्वावर होत आहे.

तसंच शेतात होणारा रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर यामुळेही चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होतेय.

चिमणीबद्दलच्या या interesting गोष्टी माहीत आहेत का?

भारतात जास्त संख्येने आढळला जाणारा पक्षी म्हणजे चिमणी. तिच्या काश्मिरी आणि वायव्यी अशा दोन जाती आहेत.

कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न हे यांचं खाद्य.

गवत, कापूस, पिसे अशा मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर अशा कुठल्याही ठिकाणी हा पक्षी घरटे बांधून राहातो.

मादी फिकट हिरव्या पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली असते.

ती साधारण ४ ते ५ अंडी देते. अंड्यांच्या रंगात स्थानिक बदलही आहेत.

नर चिमण्याच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग करडा असतो.  कानाजवळ पांढरा रंग असतो, तर चोच काळी असते. गळा ते छातीच्या भागावर मोठा काळा डाग असतो.

डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात.

नर-मादी घरटे बांधण्यापासून, अंडी उबविणं, पिलांना खाऊ घालणं वगैरे सर्व कामं मिळून करतात.

चिमण्यांचे आयुष्य सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत असते.

ज्ञात असलेली सर्वात जास्त काळ जगलेली वन्य चिमणी जवळपास दोन दशकं जगली.

त्याचबरोबर नोंद असलेली सर्वात पिंजऱ्यात ठेवलेली चिमणी सर्वाधिक 23 वर्षं जगली.

योग्य खबरदारी न घेतल्यास चिमणीची प्रजातीच नष्ट होण्याची भीती आहे. चिऊताई केवळ कवितांमध्येच शिल्लक राहण्यापूर्वी याबाबत जागृती होणं गरजेचं आहे. त्यांचं अस्तित्व टिकावं यासाठी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *