Wed. May 18th, 2022

लढेंगे-जितेंगे

हातात सलाईन, रुग्णालयात ऍडमिट आणि सीमाप्रश्नावर बोलण्याची उमेद केवळ डॉ. एन. डी. पाटील सरांच्यात होती. घटना २०१९ची आहे. कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा तीव्र विरोध करत एक इंच काय संपूर्ण सीमाभागाच महाराष्ट्रात घेऊ अशी डरकाळी त्यावेळी डॉ. एन. डी. पाटील यांनी फोडली होती. त्यानंतर मात्र येडीयुरप्पा यांनी पुन्हा सिमप्रश्नाला डीवचण्याचे धाडस केले नाही.

त्यावेळी येडीयुरप्पा यांच्या या वक्तव्यावरून सीमाभागात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. सीमावसीयांना नेहमीच डीवचणाऱ्या कन्नड सरकारच्या प्रमुखांच्या या वाक्याने सिमवासीयांवर दबाव निर्माण झाला होता. त्यामुळे डॉ. एन. डी. पाटील यांची भूमिका यावेळी महत्वाची होती. पत्रकार म्हणून मी त्यांची प्रतिक्रिया घेण्याच्या प्रयत्नात होतो. त्यांच्या फोन वर संपर्क केला. त्यावेळी ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे समजले. मात्र योगायोगाने फोन त्यांच्याकडेच होता. त्यांनी हे बोला कोण बोलतंय… असे नेहमीच्या स्टाईल ने विचारले. माझी ओळख सांगून मला जे अपेक्षित होते ते सांगितले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी हॉस्पिटलचा पत्ता दिला. सुरवातीला वाटले रुटीन चेकअप असेल म्हणून तिथे गेले असतील म्हणून तिथेच बाईट देतील. पण आत जाताच वेगळे दृश्य होते.

एका हाताला सलाईन, उठून बसता येत नसल्याने हॉस्पिटलच्या बेडवर झोपून असलेल्या अवस्थेत सर दिसले. सरांच्या तब्येतीची सुरवातीला विचारपूस केली. मात्र त्यांनी अरे तुला प्रतिक्रिया हवी होती ना म्हणत प्रश्न केला. अशा अवस्थेत प्रतिक्रिया कशी घ्यायची हा माझ्यासमोर प्रश्न होता. मात्र अनेक प्रश्नांचे उत्तर डॉ. एन. डी. पाटील होते. त्यांनी तुझे ते बिर्हाड जोड म्हणत बाईट देण्याची तयारी दर्शवली. अगदी बेडवर झोपून त्यांनी बाईट दिली. कर्नाटक सरकरला खडे बोल सुनावत एक इंच काय अख्खा सीमाभाग महाराष्ट्रत घेऊ, अशी डरकाळी त्यांनी फोडली.

ही ऊर्जा केवळ अशीच अली नव्हती आयुष्यभर त्याच्यासाठी त्यांनी संघर्ष केला होता. अन्यायाला वाचा फोडण्याची धमक त्यांच्यात होती. गोरगरीबाना न्याय देण्यासाठी आयुष्य खर्ची घालण्याची उर्मी त्यांच्यात होती. रस्त्यावर उतरून लढण्याचे बळ त्यांच्यात होते. हे सगळे सोडून आंदोलन हेच त्यांच्या जगण्याची ऊर्जा होती. त्यामुळे आजारपणात सुद्धा थांबेल तो संघर्षयात्री कसला. रुग्णालयातसुद्धा सीमाप्रश्नावर बोलण्याची ताकद या माणसाला त्यामुळेच आली असावी.

डॉ. एन. डी. पाटील यांनी उभी हयात सिमप्रश्नासाठी खर्च केली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून मोट बांधत त्याचे नेतृत्वही केले. कानडी सरकार दडपशाही करत असेल तर बेळगावात डॉ. एन. डी. सर ठाण मांडून बसत. त्यांचा दरारा इतका होता की कर्नाटक सरकार ही घाबरून जायचे. त्यामुळे सीमालढ्याचा हा लढवय्या या बाबत कोणी वकत्व केल्यावर कसा गप्प बसेल. हे त्यांच्या या व्यक्तित्वातून दिसून येत होतं.

फक्त सीमा लढा नाही तर महाराष्ट्रात अनेक मोठी आंदोलने त्यांनी उभी केली यशस्वी केली. कोल्हापुरातले टोल आंदोलन सुद्धा त्या पैकी एक.शहरांतर्गत टोल देशात केवळ कोल्हापूर शहरात लागणार होता.या अन्यायी टोलला त्यांनी विरोध करत सुमारे चार वर्षे आंदोलन केले.अगदी नातेवाईक असलेल्या अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतल्या.आणि हे आंदोलन यशस्वी करत टोल हद्दपार केला.त्यांचा हा लढा कोल्हापूरकर कधीही विसरणार नाहीत.तर रायगड जिल्ह्यात सेझ प्रकरणात शेतकऱ्यांना त्यांच्या सात बारा वर पुन्हा जमिनी मिळवून देत त्यांनी सरकारला गुडघे टेकायला लावले होते.

लढेंगे-जितेंगे ही मुठ्या आवळून घोषणा देत ते सरकारला घाम फोडत होते. अभ्यासू मांडणी, प्रश्नांची जाण, आंदोलन कधी करायचे कुठवर रेटायचे कुठे थांबवायचे याचे उत्तम नियोजन. अस्संलिखित इंग्रजी बोलत समोरच्या आय ए एस, आयपीएस अधिकाऱ्यांना कोंडीत पकडणे. अशा जमेच्या बाजू त्यांच्याकडे होत्या. विधिमंडळात सहकार मंत्री म्हणून काम करताना केलेल्या कामाचा अनुभव होता. प्रामाणिकपणे काम करत गोळा केलेला गोतावळा होता. एका हाकेला ओ देणारा जनसमुदाय होता. अन्यायाला वाचा फोडण्याची धमक त्यांच्यात होती. या जोरावर ते सरकार कोणतेही असो त्यांना हादरवून सोडत असत.

मृत्यूशय्येवर असताना या संघर्ष यात्रीने हे पुस्तक इथे ठेव, मी फोन करतो तुझे काम झाले म्हणून समज, कोल्हापूरला खंडपीठ व्हायला पाहिजे, अशी वक्तवे त्यांच्या तोंडून येत असत. आयुष्यभर नीतिमत्ता आणि विवेकाच्या जोरावर केलेल्या कामाचा फ्लॅश बॅक जणू त्यांच्या डोळ्यासमोरून जात होता. शरद पवारांचे सख्खे मेहुणे असलेल्या एन डी पाटलांना कमवायचे असते तर खूप कमावता आले असते मात्र त्यांनी माणसे कमावली आणि विचार पेरले. अन्यायाला वाचा फोडत संघर्षाला न्याय दिला.आयुष्य कसे जगावे सांगत आज हा संघर्षयात्री ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांची प्रतिक्रिया घेतली त्याच हॉस्पिटलमध्ये कायमचा स्थिरावला.

– ज्ञानेश्वर साळोखे, कोल्हापूर

( या मताशी संपादक अथवा प्रकाशन संस्था सहमत असतीलच असे नाही. या लेखात लेखकाने मांडलेली मते स्वतंत्र आहेत. )

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.