भारत-पाकिस्तान सामना काही तासांवर, क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण

टी-२० वर्ल्डकपमधील महामुकाबला म्हणजेच भारत पाकिस्तान सामना काही तासांवर येऊन ठेपला आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार असून या सामन्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट, उपकर्णधार रोहित शर्मा तसेच मैदानाबाहेरील कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांच्यामुळे भारतीय संघाची रणनिती मजबूत होणार आहे.
टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकविरुद्ध सहावा विजय मिळवण्याच्या हेतूने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की, अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. सर्वांचे लक्ष सामन्याकडे लागलेले असते. त्यामुळे या सामन्यासाठी चाहत्यांनी तयारी सुरू केली असून भारतीय संघाच्या विजयासाठी अनेक भारतीयांनी साकडंदेखील घातले आहे.
आयसीसी वर्ल्डकपमध्ये एकदिवसीय आणि टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान सामन्यात भारताचा पराभव झालेला नाही. भारत-पाकिस्तान सामना भारताचेच नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा असतो. तसेच आयसीसीने यावर्षी दोन्ही संघांना एकातच टाकल्यामुळे भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये एकाहून जास्त लढत होण्याची शक्यता आहे.
टी-२० वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान या संघातील सामना रविवार २४ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० वा. सामना सुरू होईल. हा सामना युएईमधील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.
भारतीय संभाव्य संघ : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार