Fri. Nov 15th, 2019

कोट्याधीश पुलं

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दीला सुरुवात झाली आहे. पु.ल. देशपांडे यांना रसिक वाचकांचं जितकं उदंड प्रेम लाभलं, तेवढं प्रेम ना त्या आधीच्या लेखकांना मिळालं, ना त्यांच्या नंतरच्या… पु.लं. उत्तम लेखक तर होतेच, पण ते उत्तम गायक होते, संगीतकार होते, अभिनेते होते, दिग्दर्शक होते.. साहित्य कलाक्षेत्रातील सर्वं अंगांना पुलंनी स्पर्श केलाय. विशेष म्हणजे या सर्वांपेक्षा उत्तम आनंदयात्री ते होते. आनंदाने जगणं आणि इतरांनाही आनंद देणं हे त्यांच्या आयुष्याचं सूत्र होतं. त्यांच्या अनेक वक्तव्यांमधूनही हजरजबाबीपणाचा प्रत्यय येई… पुलंचे काही खास किस्से-

पु.ल. शाळेत असताना त्यांना एकाने विचारलं, “देशपांडे, तुझे पूर्वज शेण विकायचे ना!”

मात्र यावर चिडण्याऐवजी पुलं मिश्किलपणे म्हणाले, “हो ना, तुमच्या पूर्वजांना खाण्यासाठी शेण लागायचं ना, म्हणून विकायचे”

चीनमधील भोजनात सर्व पदार्थांत स्वीट कॉर्न अर्थात मका घातलेला असे. त्याबद्दल पुलं म्हणाले, “या अन्नाला ‘सर्वात्मका’ म्हणायला हवं.”

फ्रान्समध्ये द्राक्षाच्या वाईनचं रसपान करताना भारतीय आणि फ्रेंच संस्कृतीतला फरक त्यांनी एका वाक्यात सांगितला… ते म्हणाले, “यांच्या संस्कृतीत द्राक्ष, आणि आपल्या संस्कृतीत रुद्राक्ष!”

एकदा एक चाहता पुलंना म्हणाला, “माझी फक्त दोन व्यक्तींवर श्रद्धा आहे. एक संत ज्ञानेश्वर आणि एक तुम्ही. मी माझ्या खोलीच्या भिंतीवर ज्ञानेश्वरांच्या फोटो शेजारी तुमचाच फोटो लावला आहे.”

यावर उत्तर देताना पुलं पटकन म्हणाले, “असे करू नका, नाहीतर लोक विचारतील ज्ञानेश्वरांनी ज्याच्याकडून वेद वदवून घेतले तो रेडा हाच का म्हणून!”

पुलंचे विद्यार्थी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदुजा रुग्णालयात दाखल असताना पुलं त्यांना भेटायला आले. त्यावेळी बाळासाहेबांना ते गमतीने म्हणाले, “यांच्या खोलीच्या दरवाजावर ‘गर्वसे कहो हम हिंदुजा में है’ असं लिहायला हरकत नाही.”

जेव्हा अभिनेते शरद तळवलकर यांची पुलंशी पहिल्यांदा ओळख करून दिली, तेव्हा पुलं म्हणाले, “अरे व्वा! हा माणूस नक्कीच सरळ असणार… याच्या नावात ना काना, मात्रा, ना वेलांटी ना उकार… म्हणजे हा माणूस नावाप्रमाणे सरळच असणार” असं मिश्किलपणे पुलं म्हणाले.

शासकीय कामामध्ये वापरण्यात येणाऱ्या दुर्बोध मराठीबद्दल बोलताना पुलं देशपांडे म्हणाले, रेडिओवरच्या मराठीमध्ये ‘अमुक अमुक वृत्त पोलीस सूत्रांनी दिलं’ असं ऐकल्यावर मला पोलीस सूत्र हे काय प्रकरण आहे असा प्रश्न पडला. नंतर सोर्स या इंग्रजी शब्दाचं ते शब्दशः मराठी भाषांतर असल्याचं कळलं. म्हणजे आता आपल्या बायकोकडून एखादी बातमी कळली, तर ती ‘मंगळसूत्रा’कडून कळली, असं म्हणायला हरकत नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *