Sun. Aug 18th, 2019

आज ‘जागतिक पोहे दिवस’ : तुम्हाला कोणते पोहे आवडतात?

0Shares

महाराष्ट्रात नाश्त्यामध्ये केला जाणारा हमखास पदार्थ म्हणजे पोहे. घरघरांत केलेल जाणारे पोहे हा पदार्थ आता जगभरात पोहोचला आहे. आज जागतिक पोहे दिनानिमित्त जाणून घेऊ पोह्यांबद्दलच्या काही खास गोष्टी.-

मराठी मध्यमवर्गीय घरांमध्ये उपमा, सांजा, शिरा यांव्यतिरिक्त नाश्त्याला आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे कांदेपोहे किंवा बटाटेपोहे.

वधुपरीक्षेच्या वेळीतर महाराष्ट्रात हमखास कांदापोहे आणि चहाचा बेत असतोच असतो.

‘अरेंज मॅरिज’ पद्धतीत उपवर मुलगी मुलाला आणि सासरच्या मंडळींना पोहेच खाऊ घालते.

महाराष्ट्राच्या विविध भागांत पोहे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.

कांदा पोहे, बटाटा पोहे घरोघरी केले जातात.

त्यासाठी कधी जाड पोह्यांचा वापर केला जातो, तर काही ठिकाणी पातळ पोह्यांचा.

नागपुरला पोह्यांवर झणझणीत तर्री ओतून खायची पद्धत आहे. या पोह्यांना ‘तर्री पोहे’ किंवा ‘कट पोहे’ म्हणतात.

पुण्यात सांबर पोहे प्रसिद्ध आहेत. येथे पोह्यांवर तर्रीऐवजी सांबर ओतलं जातं. तसंच खोबऱ्याची ओली चटणी यासोबत असते.

कोल्हापूरचे मटार पोहे प्रसिद्ध आहेत. येथे पोह्यांमध्ये मटारीचे दाणे मोठ्या प्रमाणावर टाकतात.

सोलापूरला पोह्यांमध्ये शेंगदाण्यांचं प्रमाण जास्त असतं.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये कालवलेले पोहे तर कोकण कोळाचे पोहे तर असे वेगवेगळ्या प्रकारचे कांदेपोहे पाहायला मिळतात.

विशेष म्हणजे हा खाद्यपदार्थ महाराष्ट्राचा लाडका असला, तरी पोह्यांसाठी प्रसिद्ध असणारं शहर म्हणजे मध्य प्रदेशातील इंदौर.

इंदौर येथे प्रत्येक गल्लीगल्लीत पोहे विकणाऱ्यांची मोठी संख्या असते. तेथे प्रत्येक हॉटेलमध्ये आणि हॉटेलबाहेर पोह्यांची रास घेऊन उभे असणारे विक्रेते दिसतात.

या पोह्यांवर शेव, तिखट बुंदी, फरसाण टाकलं जातं.

ओल्या खोबऱ्याचा किस आणि पिळलेलं लिंबू यांच्याबरोबरच स्पेशल ‘जीरावन’ हा मसाला येथील पोह्यांची लज्जत वाढवतो.

दडपे पोहे हा पदार्थही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. याशिवाय दहीहंडीच्या उत्सवात शाळेशाळेत दहीकाला वाटला जातो. यामध्ये पोहे असतात. दूध पोहे, दहीपोहे यांसारखे पदार्थही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *