Monday, November 17, 2025 09:34:10 PM

इराण - इस्रायलमध्ये तणाव

इराण - इस्रायलमध्ये तणाव

नवी दिल्ली, १३ एप्रिल २०२४ , प्रतिनिधी : इराण कधीही इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता गृहित धरून भारताने शुक्रवारी नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार भारतीयांनी दोन्ही देशांमध्ये प्रवास करू नये, असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिला आहे. तर इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव पराकोटीला पोहोचला असून पश्चिम आशियावर युद्धाचे सावट आहे. इस्रायलने ११ दिवसांपूर्वी इराणच्या सिरीयातील दूतावासावर हल्ला केला होता. त्यानंतर या दोन देशांतील तणाव कमालीचा शिगेला पोहोचला असून पश्चिम आशियावर युद्धाचे ढग दाटले आहेत. त्यामुळे अमेरिकेसह काही देशांनी आपापल्या नागरिकांना इराण आणि इस्रायलचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. भारतानेही शुक्रवारी मार्गदर्शक सूचना जारी करून भारतीयांना खबरदारीचा इशारा दिला. इराण आणि इस्रायलबरोबरच भारतीयांनी म्यानमारलाही जाणे टाळावे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. म्यानमारच्या सित्वे शहरातील सुरक्षाविषयक परिस्थिती अस्थिर असल्याने तेथील वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना यांगून शहरात हलवण्यात आले आहे. भारत म्यानमारमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री