Israel vs Iran War: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतरही इराणने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवत दुबई आणि इतर भागांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. याला चोख प्रत्युत्तर म्हणून अमेरिका आणि इस्रायलने तेहरानवर हल्ल्यांची दुसरी लाट सुरू केली असून, यामध्ये इराणच्या लष्करी नेतृत्वाचे कंबरडे मोडले आहे. इराणचे सशस्त्र दलांचे चीफ ऑफ स्टाफ अब्दुल रहीम मौसावी आणि संरक्षण मंत्री अझीज नासिरजादेह हे देखील या हल्ल्यात मारले गेल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
लष्करी नेतृत्वाचा मृत्यू आणि नव्या कमांडरची नियुक्ती
इराणच्या अधिकृत 'आयआरएनए' (IRNA) वृत्तसंस्थेने शनिवारी झालेल्या अमेरिका-इस्रायली हल्ल्यात चीफ ऑफ स्टाफ मौसावी आणि संरक्षण मंत्री नासिरजादेह यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. याशिवाय, खमेनींचे सुरक्षा सल्लागार अली शामखानी आणि आयआरजीसीचे कमांडर-इन-चीफ मोहम्मद पाकपूर यांचाही या कारवाईत अंत झाला आहे. या मोठ्या हानीनंतर ब्रिगेडियर जनरल अहमद वाहिदी यांची इराणचे नवे 'कमांडर-इन-चीफ' म्हणून तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे.
तेहरानमध्ये भीषण स्फोट; इस्रायलची हवाई मोहीम
रविवारी सकाळी तेहरानमध्ये पुन्हा एकदा भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले. इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र यंत्रणा आणि हवाई संरक्षण तळांना लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले आहेत. या संयुक्त कारवाईत इराणचे अतोनात नुकसान झाले असून, लष्कराचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी मारले गेले आहेत, ज्यांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत.
खामेनींच्या मृत्यूने इराणमध्ये शोककळा
सर्वोच्च नेते खामेनी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण इराणमध्ये दुःखाचे वातावरण आहे. नागरिक रस्त्यावर उतरून शोक व्यक्त करत असून, अनेक ठिकाणी लोक बेशुद्ध पडल्याच्या हृदयद्रावक बातम्या येत आहेत. इराणसाठी हा इतिहासकाळातील सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा - Israel, US - Iran war : भारतीय विमानांची 850 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द; आखाती देशांत विमाने अडकली, हजारो प्रवाशांचे हाल
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
या घडामोडींवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृत निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले, "इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक असलेला खामेनी अखेर मारला गेला आहे. हा केवळ इराणच्या लोकांसाठीच नाही, तर खामेनी आणि त्याच्या टोळीने जगभरात ज्या निष्पाप लोकांना मारलं त्या सर्वांसाठी मिळालेला न्याय आहे."