Earthquake In Afghanistan: उत्तर अफगाणिस्तानला सोमवारी मध्यरात्री पुन्हा एकदा भूकंपाने हादरवले. 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपात किमान 10 जणांचा मृत्यू, तर 150 पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षण संस्था (USGS) यांच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र खुल्मपासून 22 किलोमीटर पश्चिम-नैऋत्येस आणि सुमारे 28 किलोमीटर खोलीवर होते. हा भूकंप स्थानिक वेळेनुसार रात्री 12:59 वाजता झाला.
देशभरात भूकंपाचे तीव्र धक्के
भूकंपानंतर उत्तर अफगाणिस्तानातील अनेक भागात नागरिक घराबाहेर पडले. स्थानिक प्रशासनानुसार, भूकंपामुळे काही ठिकाणी इमारतींना आणि घरांना नुकसान झाले असून, बचाव पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे.
हेही वाचा - अमेरिकेचा वर्क व्हिसा किंवा ग्रीन कार्ड मिळविण्यासाठी आता द्यावा लागणार DNA नमुना? ट्रम्प सरकारचा नवा प्रस्ताव चर्चेत
गेल्या आठवड्यातही झाला होता भूकंप
हा भूकंप गेल्या आठवड्यात झालेल्या 4.3 रिश्टर स्केलच्या धक्क्यानंतर झाल्याने चिंता वाढली आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑक्टोबर 2025 रोजी 4.3 तीव्रतेचा भूकंप 10 किमी खोलीवर झाला होता. त्यापूर्वी 24 ऑक्टोबरला 3.7 रिश्टर स्केलचा भूकंप, आणि त्याआधी 31 ऑगस्टला 6.0 तीव्रतेचा भूकंप, ज्यात पाकिस्तान सीमेजवळ 2,200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, 7 ऑक्टोबर 2023 रोजीही 6.3 तीव्रतेच्या भूकंपानंतर आलेल्या आफ्टरशॉक्समुळे 4,000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाने भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे.
हेही वाचा - 'ख्रिश्चनांवरील हल्ले थांबवा नाहीतर परिणाम भोगा...'; अमेरिकेचा नायजेरियाला कठोर इशारा
अफगाणिस्तान भूकंपप्रवण का आहे?
तज्ज्ञांच्या मते, अफगाणिस्तान जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण प्रदेशांपैकी एक आहे. येथे भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सची टक्कर होत असल्याने पृथ्वीच्या कवचात भेगा पडतात व त्यामुळे वारंवार भूकंप होतात. विशेषतः हिंदूकुश आणि पामीर पर्वतरांगांमध्ये दरवर्षी अनेक तीव्र भूकंप होतात, काही तर 200 किलोमीटर खोलीपर्यंत नोंदवले जातात. ही भूकंपीय घटना जगभरात अत्यंत दुर्मिळ मानली जाते.