India-UK Free Trade Agreement
Edited Image
नवी दिल्ली: भारत आणि युनायटेड किंग्डम (यूके) यांच्यात एक मुक्त व्यापार करार (FTA) झाला आहे. यानंतर, दोन्ही देशांमध्ये व्यापार, रोजगार आणि गुंतवणुकीच्या नवीन संधी वाढणार आहेत. दोन्ही देशांमधील या करारात बहुतेक वस्तू आणि सेवांवरील शुल्क कमी करण्याबद्दल किंवा काढून टाकण्याबद्दल चर्चा केली आहे. या व्यापार करारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर, ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या किमती कमी होऊ शकतात. ज्यामध्ये लँड रोव्हर कार, वाईन आणि स्कॉच व्हिस्कीचा समावेश आहे.
भारत आणि इंग्लडमध्ये मुक्त व्यापार करार -
भारत-यूके मुक्त व्यापार करारावर बऱ्याच काळापासून वाटाघाटी सुरू होत्या. 6 मे 2025 रोजी दोन्ही देशांनी त्याची औपचारिक घोषणा केली. भारताने ब्रिटनमधून आयात होणाऱ्या जवळपास 90% वस्तूंवरील आयात शुल्क कमी केले आहे. यानंतर, भारतात येणाऱ्या ब्रिटिश स्कॉच व्हिस्की आणि इतर अल्कोहोलवरील आयात शुल्क 150% वरून 75% पर्यंत कमी करण्यात आले आहे. येत्या 10 वर्षांत हे शुल्क 40% पर्यंत कमी करण्यात येणार आहे. या कराराअंतर्गत, हिरे, सोने, चांदी आणि पेट्रोलियमसारख्या उत्पादनांवरील आयात शुल्क देखील कमी केले जाईल.
भारतातील 'या' क्षेत्रांमध्ये निर्यात वाढणार -
भारतातून यूकेला जाणाऱ्या कपडे आणि पादत्राणे यासारख्या वस्तूंवरील आयात शुल्क देखील यूकेकडून कमी केले जाईल. ज्यामुळे भारतातील कपडे, चामडे, पादत्राणे आणि सागरी उत्पादनांची निर्यात वाढण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, औषधनिर्माण क्षेत्रातील म्युच्युअल रिकग्निशन करार (MRA) द्वारे भारतीय औषधांना यूकेमध्ये अतिरिक्त बाजारपेठ उपलब्ध होईल.
हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 3 देशांचा दौरा रद्द; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोठा निर्णय
शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढणार -
याशिवाय, या करारात भारत आणि ब्रिटनमधील काही सेवांसाठीचे नियम शिथिल करण्याबाबतही चर्चा करण्यात आली आहे. ज्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांसाठी यूकेमध्ये अभ्यास आणि रोजगाराच्या संधी वाढतील. गुंतवणुकीला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी, दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय गुंतवणूक करारावरही सहमती झाली आहे.
हेही वाचा - ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये हाहाकार, कराची स्टॉक एक्स्चेंज कोसळले
दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होणार -
दरम्यान, या मुक्त व्यापार करारानंतर, भारत आणि ब्रिटनमधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होईल. सध्या भारत युकेला सुमारे 10.5 अब्ज डॉलरची निर्यात करतो. याशिवाय, सुमारे 7 अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तू यूकेमधून भारतात आयात केल्या जातात. आता भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करारांतर्गत, दोन्ही देशांनी 2030 पर्यंत व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.