MP Kalyan Kale Stranded in Dubai: इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून, याचे पडसाद थेट दुबई आणि इतर आखाती देशांत उमटू लागले आहेत. इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांसह दुबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केल्यामुळे तिथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या धामधुमीत महाराष्ट्रातील जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह अनेक नागरिक अडकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
खासदार डॉ. कल्याण काळे सुरक्षित; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
खासदार डॉ. कल्याण काळे आपल्या कुटुंबासह पूर्वनियोजित दौऱ्यासाठी दुबईत गेले होते. मात्र, युद्धामुळे विमानसेवा विस्कळीत झाल्याने ते तिथेच अडकून पडले. या बातमीमुळे त्यांच्या मतदारसंघात चिंतेचे वातावरण होते. मात्र, त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाने फेसबुक पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे की, "खासदार काळे पूर्णपणे सुखरूप असून त्यांच्याशी नियमित संपर्क सुरू आहे. त्यांची प्रकृती आणि सुरक्षिततेबाबत काळजी करण्याचे कारण नाही. कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या माहितीवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये."
नागपूरची 9 कुटुंबे हॉटेलमध्ये अडकले
दुसरीकडे, पर्यटनासाठी दुबईला गेलेल्या नागपूरच्या चिकटे आणि घारफेंडे कुटुंबातील 9 जणांची अवस्था बिकट झाली आहे. 3 मार्च रोजी त्यांना भारतात परतायचे होते, परंतु दुबई विमानतळ बंद झाल्याने त्यांचा प्रवास थांबला आहे. या पर्यटकांना हॉटेलबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सतत होणाऱ्या मिसाईल हल्ल्यांमुळे या कुटुंबांमध्ये घबराट पसरली आहे. हॉटेलकडून जेवण-खाण्याची सोय होत असली, तरी सुरक्षेच्या कारणास्तव या पर्यटकांनी भारत सरकारकडे आपल्याला तातडीने बाहेर काढण्याची विनंती केली आहे.
हेही वाचा - Iran-Israel War: विमानतळ बंद, संपर्क तुटला... दुबईत अडकले जळगाव जिल्ह्यातील 31 नागरिक
युद्धभूमीतील भीषण वास्तव
इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील या युद्धामुळे हवाई क्षेत्र (Airspace) पूर्णपणे बंद झाले आहे. दुबईसारख्या गजबजलेल्या शहरातही आता युद्धाची सावली असल्याने, तिथल्या हजारो भारतीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकार या अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.