Israel-Iran Conflict: मध्यपूर्वेतील इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचे पडसाद आता आग्नेय आशियाई राजकारणात उमटू लागले आहेत. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी आपल्या सरकारविरुद्ध 'तख्तापलट' करण्याचा मोठा कट रचला जात असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. इराणला उघडपणे पाठिंबा दिल्याने आणि इस्रायलच्या धोरणांना विरोध केल्यामुळे आंतरराष्ट्रीय ज्यू संघटना आपल्याला सत्तेवरून खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नेमका आरोप काय आहे?
3 मार्च रोजी मलेशियाच्या संसदेत बोलताना पंतप्रधान इब्राहिम यांनी विरोधक आणि विदेशी शक्तींवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी ब्लूमबर्गसारख्या आंतरराष्ट्रीय मीडिया हाऊसेसचा संदर्भ देत आरोप केला की, इस्रायलशी संबंधित संघटना मलेशियाची प्रतिमा मलिन करून अमेरिकेचे लक्ष वेधून घेत आहेत. देशातील काही स्थानिक विरोधी नेत्यांनी या विदेशी शक्तींशी हातमिळवणी करून सरकार पाडण्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.
इराण-गाझा कनेक्शन आणि वैयक्तिक लक्ष्य
पंतप्रधान इब्राहिम यांच्या मते, गाझा पट्टीतील नरसंहार आणि इराणचे नेते आयतुल्लाह खामेनेई यांच्या हत्येचा तीव्र निषेध केल्यामुळेच त्यांना लक्ष्य केले जात आहे. "गाझा आणि इराणच्या बाजूने ठाम भूमिका घेणे हा गुन्हा आहे का? अशा धमक्यांना मी मुळीच जुमानणार नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले. या कटाची सखोल चौकशी केली जाईल आणि कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा - India On War Alert: पश्चिम आशिया धगधगत असतानाच भारताचा सीमेवर मोठा लष्करी संदेश; पाच मार्चपासून महासराव, 'नोटाम' जारी झाल्याने खळबळ
मलेशियाची बाजू आणि धार्मिक समीकरणांचे वळण
इराणला उघड पाठिंबा देणारा मलेशिया हा आग्नेय आशियातील प्रमुख मुस्लिम देश ठरला आहे. खामेनी यांच्या हत्येचा अधिकृत निषेध नोंदवल्यानंतर जागतिक राजकारणात मलेशियाच्या भूमिकेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. मलेशियात ज्यू धर्मीयांची संख्या अत्यंत कमी असूनही पंतप्रधानांनी थेट ज्यू संघटनांवर आरोप केल्याने या प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय वळण मिळाले आहे. यापूर्वी 2020 आणि 2021 मध्येही मलेशियात सत्ता उलथवण्याचे प्रयत्न झाले होते, ज्याची आठवण या निमित्ताने पुन्हा ताजी झाली आहे.