Russia Ukraine War: गेल्या काही दिवसांपासून जागतिक पातळीवर अनेक देशात आप-आपसात संघर्ष दिसून येत आहे. गेल्या महिन्यात इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धबंदी झाली. परंतु, आता रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष वाढताना दिसत आहे. रशियाने शुक्रवारी युक्रेनच्या राजधानीवर हवाई हल्ले करून मोठ्या प्रमाणात विनाश केला. युक्रेनच्या हवाई दलाने एका वृत्तवाहिनीला सांगितले की रशियन सैन्याने कीववर सुमारे 540 ड्रोन आणि 11 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात सुमारे 23 लोक जखमी झाले. कीवच्या 6 जिल्ह्यांतील निवासी भागात आगीच्या घटना घडल्या.
रशियाच्या या हवाई हल्ल्यात युक्रेनमधील रेल्वे स्टेशनचेही नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यांवर उभ्या असलेल्या इमारती आणि गाड्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. रात्रभर कीवमध्ये सायरन वाजत राहिले. रशियन सैन्याच्या हल्ल्याबद्दल लोकांना आधीच सतर्क करण्यात आले होते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. कीवच्या महापौर विटाली क्लित्स्को यांनी सांगितले की, रशियन सैन्याचे मुख्य लक्ष्य राजधानी कीव होते. काल रात्री कीवमध्ये स्फोट आणि गोळीबाराचे आवाज ऐकू आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसत होते.
हेही वाचा - अमेरिकेचा इराणला मोठा धक्का! तेल व्यापारावर लादले नवीन निर्बंध
दरम्यान, युक्रेनियन हवाई दलाने आकाशात 450 हून अधिक ड्रोन नष्ट केले. देशभरात 8 ठिकाणी 9 क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. गुरुवारी रात्री उशिरा पूर्व युक्रेनियन शहरात पोकरोव्स्क येथे रशियन सैन्याच्या गोळीबारात 5 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. रशियन सैन्याच्या हल्ल्यामुळे कीवमधील अनेक रेल्वे स्थानकेही उद्ध्वस्त झाली आहेत, ज्यामुळे गाड्यांचा मार्ग बदलावा लागला.
हेही वाचा - काय सांगता!! जपानने तयार केले कृत्रिम रक्त
कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी माध्यमांना सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आदल्या दिवशी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. संभाषणात पुतिन यांनी ट्रम्प यांना सांगितले होते की ते युक्रेनमध्ये त्यांचे लक्ष्य निश्चितपणे पूर्ण करतील, परंतु ते युद्धबंदीसाठी वाटाघाटी करण्यास तयार आहेत. तथापी, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्याबाबत चर्चा करणार आहेत.