Sunday, March 08, 2026 11:55:27 PM

Pak-Afghanistan War: तालिबानचा पाकिस्तानवर भीषण प्रतिहल्ला; पंतप्रधानांच्या कार्यालयासह लष्करी तळांना केलं लक्ष्य

तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे कार्यालय असलेल्या फैजाबाद परिसरासह अनेक प्रमुख लष्करी प्रतिष्ठानांना यशस्वीरित्या लक्ष्य केले आहे.

pak-afghanistan war तालिबानचा पाकिस्तानवर भीषण प्रतिहल्ला पंतप्रधानांच्या कार्यालयासह लष्करी तळांना केलं लक्ष्य

Pak-Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमावाद आता थेट युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तालिबानने शुक्रवारी पाकिस्तानच्या भूभागावर जोरदार प्रतिहल्ला केला. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे कार्यालय असलेल्या फैजाबाद परिसरासह अनेक प्रमुख लष्करी प्रतिष्ठानांना यशस्वीरित्या लक्ष्य केले आहे.

तालिबानकडून थेट हवाई हल्ल्यांचा दावा
तालिबानच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाचे उपप्रवक्ते हमदुल्लाह फितरत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाण हवाई दलाने शुक्रवारी सकाळी 11 वाजता पाकिस्तानच्या विविध भागांत हल्ले केले. यामध्ये इस्लामाबादमधील फैजाबादजवळील लष्करी छावणी, नौशेरा, जमरुद लष्करी कॉलनी आणि अबोटाबाद येथील लष्करी तळांचा समावेश आहे. "आमची ही कारवाई पूर्णपणे यशस्वी झाली असून यात पाकिस्तानी लष्कराची महत्त्वाची केंद्रे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत," असा दावा फितरत यांनी केला आहे.

मध्यरात्री काय घडले? पाकिस्तानची कारवाई
या संघर्षाची ठिणगी गुरुवारी मध्यरात्री पडली, जेव्हा पाकिस्तानी हवाई दलाने काबूल, कंधार आणि पक्तिया येथील तालिबानच्या लष्करी तळांवर भीषण हल्ले केले होते. या हल्ल्यात तालिबानचे अनेक वरिष्ठ कमांडर आणि 130 लढाऊ मारले गेल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. या आक्रमणामुळे संतापलेल्या तालिबानने तातडीने प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आणि सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली.

दोन्ही बाजूंकडून मोठ्या जीवितहानीचे दावे
या रक्तपातामध्ये दोन्ही देशांकडून एकमेकांचे मोठे नुकसान केल्याचे दावे केले जात आहेत. तालिबानच्या पथकाने प्रतिहल्ल्यात 55 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचे आणि 15 जणांना ओलीस ठेवल्याचे म्हटले आहे. तसेच, सीमेवरील 23 पाकिस्तानी चौक्यांवर ताबा मिळवल्याचाही दावा अफगाणिस्तानने केला आहे. पाकिस्तानमधील फैजाबाद शहरात जिथे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे कार्यालय आहे, त्या परिसराला लक्ष्य करून तालिबानने पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.

हेही वाचा - Pakistan-Afganistan War : पाकिस्तानची अफगाणिस्तानने जीरवली, 13 सैनिकांचे मृतदेह परत पाठवत दिले प्रत्युत्तर

 

युद्धाचे सावट आणि तणाव वाढला
गेल्या काही वर्षांपासून ड्युरंड लाईन आणि सीमेवरील कुरापतींमुळे दोन्ही देशांतील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. मात्र, आता थेट हवाई हल्ले आणि लष्करी तळांना लक्ष्य केल्यामुळे दक्षिण आशियातील भू-राजकीय स्थिती अधिक स्फोटक बनली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी हालचाली वाढल्या असून सीमाभागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री