कुणी कल्पना केली होती का, की अवघ्या 10 वर्षांच्या मुलाने हौसेपोटी घेतलेला एक छोटासा 'वेब पत्ता' भविष्यात जगातील सर्वात महागडा डिजिटल व्यवहार ठरेल? मलेशियन तंत्रज्ञान उद्योजक अर्सयान इस्माईल (Arsyan Ismail) यांची ही थक्क करणारी गोष्ट सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. 1993 मध्ये वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी अर्सयान यांनी 'AI.com' हे डोमेन अवघ्या 100 डॉलर्समध्ये (तत्कालीन विनिमय दरानुसार सुमारे 300 रुपये) खरेदी केले होते. आज 32 वर्षांनंतर याच डोमेनने त्यांना तब्बल 70 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 634 कोटी रुपयांची लॉटरी लावून दिली आहे.
1993 चा तो काळ जेव्हा इंटरनेट बाल्यावस्थेत होते, तेव्हा अर्सयान यांनी हे डोमेन घेण्यामागे कोणतेही मोठे व्यावसायिक गणित नव्हते. 'Arsyan Ismail' या त्यांच्या नावातील सुरुवातीची दोन अक्षरे 'AI' अशी आहेत, केवळ त्यांच्या नावाशी साधर्म्य जुळते म्हणून त्यांनी हा दुर्मिळ दोन अक्षरी वेब पत्ता पदरात पाडून घेतला होता. "देणाऱ्याचे हात हजार" अशी एक म्हण आहे, पण इथे अर्सयान यांच्या दूरदृष्टीने किंवा नशिबाने त्यांना 'डिजिटल रिअल इस्टेट'चा असा काही फायदा मिळवून दिला, ज्याचे मूल्य आज सोन्यापेक्षाही वेगाने वाढले आहे.
हेही वाचा: Tipu Sultan Photo Controversy : मालेगाव उपमहापौरांच्या दालनात 'टिपू सुलतान'च्या फोटोवरून रणकंदन; शान-ए-हिंद यांच्या निर्णयामुळे हिंदू संघटनांचा संताप
एप्रिल 2025 मध्ये झालेला हा व्यवहार इंटरनेटच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा सार्वजनिकरित्या नोंदवलेला व्यवहार मानला जात आहे. 'Crypto.com' या दिग्गज कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस मार्सझेलेक (Kris Marszalek) यांनी हे डोमेन अर्सयान यांच्याकडून खरेदी केले. विशेष म्हणजे, या संपूर्ण कराराची रक्कम क्रिप्टोकरन्सीद्वारे अदा करण्यात आली आहे. या व्यवहाराने 2010 मधील 'CarInsurance.com' (49.7 दशलक्ष डॉलर्स) या डोमेन विक्रीचा विक्रम मोडीत काढत जागतिक स्तरावर एक नवा इतिहास रचला आहे.
या विक्रमी व्यवहाराची चर्चा तेव्हा अधिक रंगली जेव्हा 'सुपर बाउल LX' (Super Bowl LX) या जागतिक कीर्तीच्या क्रीडा स्पर्धेदरम्यान एका जाहिरातीत हे डोमेन झळकले. ख्रिस मार्सझेलेक यांनी 'AI.com' ला केवळ एक पत्ता म्हणून नाही, तर 'एजंटिक एआय' (Agentic AI) या नव्या व्यासपीठासाठी वापरण्याचे ठरवले आहे. हा एक प्रगत पर्सनल एआय एजंट असून तो मेसेज पाठवणे, स्टॉक ट्रेडिंग करणे आणि विविध अॅप्स हाताळणे अशी कामे स्वयंचलितपणे करण्यास सक्षम असेल.
तंत्रज्ञानाच्या युगात 'योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय' काय किमया करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे अर्सयान इस्माईल. ज्या 'AI' अक्षरांना त्यांनी नावाचा भाग समजून जपले, त्याच कृत्रिम बुद्धिमत्तेने (Artificial Intelligence) संपूर्ण जगाचा चेहरामोहरा बदलला आणि अर्सयान यांना एका रात्रीत जागतिक स्तरावरील सर्वात श्रीमंत डोमेन मालकांच्या पंक्तीत नेऊन बसवले. हा प्रवास केवळ एका व्यवहाराचा नसून, डिजिटल मालमत्तेच्या वाढत्या ताकदीची साक्ष देणारा आहे.
हेही वाचा: Anand Sagar death: भारतीय दूरचित्रवाणीतील एक युग संपले: रामायणचे वारसदार आनंद सागर यांचे 84व्या वर्षी निधन