Tuesday, February 17, 2026 04:51:49 PM

Alex Honnold: कोणताही दोर नाही, सुरक्षा नाही! ॲलेक्स हॉनोल्डने 508 मीटर उंच ‘तैपेई 101’ वर केली थरारक फ्री-सोलो चढाई

जगप्रसिद्ध फ्री-सोलो गिर्यारोहक अॅलेक्स हॉनोल्डने तैवानमधील तैपेई 101 या 508 मीटर उंच इमारतीवर कोणतीही सुरक्षा साधने न वापरता विक्रमी वेळेत चढाई करत नवा इतिहास रचला.

alex honnold कोणताही दोर नाही सुरक्षा नाही ॲलेक्स हॉनोल्डने 508 मीटर उंच ‘तैपेई 101’ वर केली थरारक फ्री-सोलो चढाई

Alex Honnold: जगातील सर्वात धाडसी फ्री-सोलो गिर्यारोहकांपैकी एक असलेल्या अॅलेक्स हॉनोल्डने पुन्हा एकदा अशक्य वाटणारी कामगिरी करून दाखवली आहे. तैवानमधील प्रसिद्ध आणि अत्यंत उंच असलेल्या ‘तैपेई 101’ या गगनचुंबी इमारतीवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने न वापरता त्याने यशस्वी चढाई करत जगभरातील साहसप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे. तब्बल 508 मीटर उंचीच्या या इमारतीवर त्याची चढाई म्हणजे श्वास रोखून धरायला लावणारा थरारच होता.

२५ जानेवारी रोजी अॅलेक्स हॉनोल्डने तैवानची राजधानी तैपेई येथे हा अनोखा पराक्रम केला. 101 मजल्यांची ही इमारत त्याने अवघ्या 1 तास 31 मिनिटांत सर केली. विशेष म्हणजे या संपूर्ण मोहिमेदरम्यान त्याने कोणताही दोरखंड, हार्नेस किंवा सुरक्षा जाळी वापरली नाही. फक्त आपल्या हातांच्या आणि पायांच्या ताकदीवर त्याने ही चढाई पूर्ण केली. ही कामगिरी पाहताना प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या नागरिकांसह जगभरातील प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला.

चढाईदरम्यानचा एक क्षण तर विशेष चर्चेत आला. इमारतीच्या मध्यभागी असलेल्या एका संरचनेजवळ अॅलेक्सने अचानक दोन्ही हात सोडले. काही सेकंद तो केवळ पाय आणि गुडघ्यांच्या आधारावर हवेत लटकलेला होता. या क्षणी अनेकांनी श्वास रोखून धरला. याच वेळेत त्याने आपल्या पाठीवरील बॅगमधून पावडर काढून हातांवर लावली आणि पुढील चढाईसाठी स्वतःला तयार केलं. हा थरार मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये कैद करण्यात आला असून सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

‘तैपेई 101’ ही इमारत फ्री-सोलो चढाईसाठी अत्यंत कठीण मानली जाते. बांबूच्या झाडासारखी रचना असलेल्या या इमारतीत आठ वेगवेगळे विभाग आहेत. प्रत्येक विभागाच्या टोकावर असलेल्या बाहेरील संरचना चढाई अधिक धोकादायक करतात. थोडीशी चूकही जीवावर बेतू शकते. त्यामुळेच या इमारतीवर सुरक्षा साधनांशिवाय चढाई करणं जवळपास अशक्य मानलं जात होतं.

ही संपूर्ण मोहीम ‘Skyscraper Live’ या नावाने नेटफ्लिक्सवर थेट प्रक्षेपित करण्यात आली होती. हवामान प्रतिकूल असल्याने ही चढाई एक दिवस पुढे ढकलण्यात आली होती. यापूर्वी 2004 साली ‘फ्रेंच स्पायडरमॅन’ म्हणून ओळखले जाणारे अलेन रॉबर्ट यांनी या इमारतीवर चढाई केली होती, मात्र त्यांनी सुरक्षा साधनांचा वापर केला होता आणि त्यांना चार तास लागले होते.

अॅलेक्स हॉनोल्ड 2017 मध्ये अमेरिकेतील ‘एल कॅपिटन’ ही 900 मीटर उंच सरळ भिंत कोणतीही सुरक्षा न वापरता चढल्यामुळे जगप्रसिद्ध झाला. त्या ऐतिहासिक मोहिमेवर आधारित ‘Free Solo’ हा ऑस्करविजेता माहितीपटही तयार झाला होता. आता तैपेई 101 वर यशस्वी चढाई करून अॅलेक्सने शहरी गिर्यारोहणातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा हा पराक्रम मानवी धैर्य, एकाग्रता आणि आत्मविश्वासाचं सर्वोच्च उदाहरण मानला जात आहे.


सम्बन्धित सामग्री