India-US Trade Deal : भारत आणि अमेरिका दरम्यान एका ऐतिहासिक अंतरिम व्यापार कराराच्या चौकटीवर सहमती झाली आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांना नवी दिशा मिळणार असून, विशेषतः भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या करारानुसार, अमेरिकेने भारतीय उत्पादनांवरील आयात शुल्क 50 टक्क्यांवरून थेट 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी रशियन तेल खरेदीमुळे अमेरिकेने लादलेल्या अतिरिक्त करामुळे भारतीय निर्यातदारांचे जे नुकसान होत होते, ते आता या कपातीमुळे थांबणार आहे.
संवेदनशील कृषी आणि दुग्धजन्य उत्पादनांना 'नो एन्ट्री'
या कराराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचे केलेले रक्षण. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केले की, अमेरिकन कृषी उत्पादनांना भारतात सरसकट प्रवेश दिला जाणार नाही. गहू, तांदूळ, मका, बाजरी यांसारखी धान्ये, तसेच बटाटे, कांदे आणि विविध डाळींच्या आयातीवर बंदी कायम असेल. याशिवाय, दूध, दही, पनीर, तूप आणि लोणी यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांनाही भारतात प्रवेश दिला जाणार नाही, ज्यामुळे स्थानिक दुग्ध व्यवसाय सुरक्षित राहील.
अमेरिकन औद्योगिक वस्तू होणार स्वस्त
करारांतर्गत भारत अमेरिकेकडून औद्योगिक वस्तू, कोरडे धान्य, काजू, सोयाबीन तेल आणि वाइन यांसारख्या उत्पादनांवरील कर कमी करणार आहे. यामुळे ही उत्पादने भारतीय बाजारपेठेत स्वस्त होतील. तसेच, भारत पुढील पाच वर्षांत अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलर्सच्या वस्तू खरेदी करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ऊर्जा उत्पादने, विमाने, विमानांचे सुटे भाग आणि प्रगत तंत्रज्ञान उत्पादनांचा समावेश असेल. डेटा सेंटर घटक आणि ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स (GPU) क्षेत्रातही दोन्ही देश सहकार्य वाढवणार आहेत.
हेही वाचा - Indians In America: ट्रम्प यांचा भारतीयांना 'दे धक्का'; या' एका निर्णयाने अमेरिकेतून 3800 भारतीयांची हकालपट्टी
MSME आणि रोजगाराच्या संधी
या व्यापार करारामुळे भारताच्या कापड, चामडे, पादत्राणे, हस्तकला आणि औषधनिर्माण क्षेत्रातील निर्यातीला मोठी चालना मिळणार आहे. भारतीय निर्यातदारांसाठी अमेरिकेची 30 ट्रिलियन डॉलर्सची अवाढव्य बाजारपेठ खुली होणार असून, याचा सर्वाधिक फायदा एमएसएमई (MSME), शेतकरी आणि मच्छीमारांना होईल. या वाढत्या व्यापारामुळे देशात विशेषतः महिला आणि तरुणांसाठी लाखो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.