ढाका: बांगलादेशातील नरसिंगदी येथे एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. 23 वर्षीय हिंदू युवक चंचल चंद्र भौमिक याला त्याच्या दुकानात झोपेत असताना जिवंत जाळण्यात आल्याची घटना शुक्रवार, 23 जानेवारी रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, अल्पसंख्याक हिंदू समाजात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने चंचल झोपेत असताना दुकानाचे शटर खाली ओढले, पेट्रोल ओतले आणि संपूर्ण इमारतीला आग लावली. चंचल जळत असताना आरोपी बाहेर उभा राहिल्याचे सांगितले जात आहे. चंचलचा जागीच मृत्यू झाला असून, हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला आहे.
चंचल हा कुटुंबाचा एकमेव आधार होता. वडिलांचे निधन झाल्यानंतर तो आजारी आई, अपंग मोठा भाऊ आणि लहान भावाची जबाबदारी सांभाळत होता. गेल्या सहा वर्षांपासून तो नरसिंगदीतील एका स्थानिक गॅरेजमध्ये काम करत होता आणि त्याच ठिकाणी राहत होता. स्थानिक रहिवासी आणि गॅरेज मालकांच्या मते, चंचल भौमिक हा शांत, प्रामाणिक आणि कोणाशीही वैर नसलेला युवक होता.
हेही वाचा: Moshim Naqvi On T20: आधी ट्रॉफी चोरली आणि आता भलताच ड्रामा; बांगलादेशला बाहेरचा रस्ता दाखवताच नक्वी म्हणतात, ‘पाकिस्तानला सवलत…'
कुटुंबीय आणि शेजाऱ्यांचा संशय आहे की ही हत्या पूर्वनियोजित असून, यामागे धार्मिक द्वेषाची भावना असू शकते. यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या घटना घडल्याने या संशयाला बळ मिळत आहे. याआधी दीपू चंद्र दास आणि खोकोन चंद्र दास यांच्या जाळून हत्या झाल्याच्या घटनांनी संपूर्ण देशातील हिंदू समाजात भीतीचे वातावरण निर्माण केले होते.
डिसेंबर अखेरीस बांगलादेशातील शरियतपूर जिल्ह्यात 50 वर्षीय हिंदू व्यावसायिक खोकोन दास यांच्यावर जमावाने हल्ला करून त्यांना जिवंत जाळण्यात आले होते. ते औषधांच्या दुकानाचे मालक होते. त्याआधी वस्त्रउद्योगात काम करणाऱ्या दीपू चंद्र दास यांना मारहाण करून त्यांचा मृतदेह जाळल्याची घटना घडली होती.
या घटनेनंतर भारतातही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या राज्य युनिटने या हत्येचा निषेध करत, बांगलादेशात बंगाली हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराचा हा एक भाग असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीला अटक करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि मानवाधिकार संघटनांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा: Sambhajinagar Crime : मैत्रिणीनेच केला विश्वासघात, कपडे बदलतानाचा व्हिडीओ चित्रित केला आणि...; छत्रपती संभाजी नगरमधील धक्कादायक प्रकार उघड