Wednesday, February 18, 2026 08:47:11 AM

What is Terawave: भाऊ, ते TeraWave म्हणजे काय रे? आता डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच डेटा होणार ट्रान्सफर, जाणून घ्या

ब्लू ओरिजिनचा हा प्रकल्प केवळ इंटरनेट सेवा नसून तो डेटा ट्रान्सफरचा एक हाय-टेक महामार्ग ठरणार आहे.

what is terawave भाऊ ते terawave म्हणजे काय रे आता डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच डेटा होणार ट्रान्सफर जाणून घ्या

नवी दिल्ली: पृथ्वीवरील व्यापारात एकमेकांचे कट्टर स्पर्धक असलेले जगातील दोन सर्वात श्रीमंत व्यक्ती, जेफ बेझोस आणि एलॉन मस्क, आता अंतराळातील वर्चस्वासाठी समोरासमोर ठाकले आहेत. अ‍ॅमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन (Blue Origin) या एरोस्पेस कंपनीने 21 जानेवारी रोजी ‘टेरावेव्ह’ (TeraWave) या आपल्या महत्त्वाकांक्षी मेगा कॉन्स्टेलेशन प्रकल्पाची घोषणा केली. मस्क यांची स्टारलिंक सध्या अंतराळात किंग असली, तरी बेझोस यांनी आता अशा क्षेत्रावर निशाणा साधला आहे जिथे वेग आणि सुरक्षिततेची परिसीमा असेल.

काय आहे ‘टेरावेव्ह’ आणि त्याचा अवाढव्य वेग?

ब्लू ओरिजिनचा हा प्रकल्प केवळ इंटरनेट सेवा नसून तो डेटा ट्रान्सफरचा एक हाय-टेक महामार्ग ठरणार आहे. या नेटवर्कअंतर्गत 5,280 उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत आणि 128 उपग्रह मध्यम कक्षेत स्थापित केले जातील. टेरावेव्हचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरले जाणारे अत्याधुनिक रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि लेझर तंत्रज्ञान. याचे सॅटेलाईट लेझरच्या मदतीने 6 टेराबिट्स प्रति सेकंद (TBPS) इतका अविश्वसनीय वेग देण्यास सक्षम असतील. डेटा सेंटर्स आणि सरकारी विभागांसाठी ही कनेक्टिव्हिटी म्हणजे एक वरदानच ठरेल.

हेही वाचा: Rozgar Mela : रोजगार मेळा उपक्रमांतर्गत पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील 61,000 तरुणांना नियुक्तीपत्रे सुपूर्द

बेझोस यांची दुहेरी चाल: ‘सामान्य’ आणि ‘खास’ ग्राहकांसाठी वेगवेगळी अस्त्रे

जेफ बेझोस यांनी आपली रणनीती अत्यंत चतुराईने आखली आहे. जिथे एलॉन मस्क यांची स्टारलिंक प्रामुख्याने सर्वसामान्य घरगुती वापरकर्त्यांना डोळ्यासमोर ठेवत आहे, तिथे बेझोस यांनी दोन स्वतंत्र आघाड्या उघडल्या आहेत. त्यांचा ‘अ‍ॅमेझॉन LEO’ (पूर्वीचा प्रोजेक्ट कुइपर) हा प्रकल्प 3,200 उपग्रहांसह सर्वसामान्यांसाठी इंटरनेट उपलब्ध करून देईल, तर ‘टेरावेव्ह’ हा पूर्णपणे कॉर्पोरेट संस्था, डेटा सेंटर्स आणि सरकारी संरक्षण विभागांसाठी असेल. म्हणजेच, “शेराला सव्वाशेर” या न्यायाने बेझोस आता मस्क यांच्या साम्राज्याला दोन वेगवेगळ्या स्तरांवर आव्हान देत आहेत.

मस्क यांची ‘स्टारलिंक’ राजवट आणि आगामी वाटचाल

सध्या अंतराळात एलॉन मस्क यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. 9,500 हून अधिक उपग्रहांच्या मदतीने स्टारलिंक आज 150 देशांत आपले पाय रोवून आहे. विशेष म्हणजे, स्टारलिंक आता भारतातही आपला ‘अनलिमिटेड डेटा प्लॅन’ अवघ्या 840 रुपयांत आणण्याच्या तयारीत आहे. 2026 पर्यंत मस्क आपले उपग्रह पृथ्वीच्या अधिक जवळ आणून वेग 1 Gbps पर्यंत नेण्याचे स्वप्न पाहत आहेत. मात्र, 2027 च्या शेवटच्या तिमाहीत जेव्हा टेरावेव्ह अवकाशात झेपावेल, तेव्हा मस्क यांच्या या किंग पदाला मोठे आव्हान मिळणे निश्चित आहे.

2027: अंतराळ युद्धाचा नवा अध्याय

चीनच्या 13,000 उपग्रहांच्या मेगा-प्रकल्पाला आणि मस्कच्या स्टारलिंकला शह देण्यासाठी बेझोस यांनी 2027 च्या चौथ्या तिमाहीची डेडलाईन निश्चित केली आहे. टेरावेव्हच्या आगमनामुळे केवळ इंटरनेटचा वेगच वाढणार नाही, तर जागतिक डेटा सुरक्षिततेचे समीकरणही बदलणार आहे. जगातील दोन सर्वात श्रीमंत व्यक्तींमधील ही स्पेस वॉर आता अधिक रंजक वळणावर पोहोचला असून, याचा अंतिम फायदा मात्र तंत्रज्ञान प्रेमींना आणि डिजिटल क्रांतीलाच होणार आहे.

हेही वाचा: India Trade Policies: विषय हार्ड; अमेरिकेला धक्का देत भारताने युरोपच खिशात टाकला; चीनला सळो की पळो करून सोडणारा ऐतिहासिक 'प्लॅन-B' तयार


सम्बन्धित सामग्री