Balochistan Conflict : बलुचिस्तानमध्ये फुटीरतावादी संघटना 'बलुचिस्तान लिबरेशन आर्मी'ने (BLA) पाकिस्तानी सुरक्षा दलांविरुद्ध आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला चढवला आहे. 'ऑपरेशन हेरोफ'च्या दुसऱ्या टप्प्यात बीएलएच्या सैनिकांनी बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टासह 10 प्रमुख शहरांमधील बाजारपेठा, पोलीस ठाणी आणि लष्करी चौक्यांवर ताबा मिळवला आहे. या भीषण संघर्षात आतापर्यंत 10 पाकिस्तानी सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, अनेक बीएलए सैनिकही मारले गेल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानी सैन्याची माघार आणि स्थानिक स्वागत
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, क्वेट्टा आणि इतर शहरांमधील बाजारपेठांमध्ये बीएलएचे सैनिक उघडपणे फिरताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, पाकिस्तानी सैनिक आपल्या चौक्या सोडून पळ काढत आहेत. क्वेट्टामधील पोलीस ठाणी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएलएने नोशकी, मास्टुंग, दलबंदिन, कलात, खारान, ग्वादर, पासनी, तुम्प आणि बुलेदा या शहरांमध्ये एकाच वेळी हल्ले करून मोठा परिसर काबीज केल्याचा दावा केला आहे.
हेही वाचा - India America Trade Deal: डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला मोठी ऑफर; 'ही' अट मान्य केली तरच व्यापार करार
ग्वादर बंदरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न
बीएलएचे फिदायीन सैनिक आता चीनच्या गुंतवणुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या ग्वादर बंदराजवळ पोहोचले आहेत. येथे पाकिस्तानी सुरक्षा दले आणि बीएलए यांच्यात जोरदार गोळीबार सुरू असून संपूर्ण परिसर धुराच्या लोटांनी व्यापला आहे. या कारवाईत पहिल्यांदाच मोठ्या संख्येने महिला बीएलए सैनिकांचाही सहभाग दिसून येत आहे. बलुच नेते सरदार अख्तर मेंगल यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले आहे की, "माझ्या आयुष्यात मी इतकी भयानक परिस्थिती कधीही पाहिली नाही."
प्रशासकीय यंत्रणा कोलमडली; आणीबाणी जाहीर
या हल्ल्यांनंतर क्वेट्टासह अनेक शहरांमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. रुग्णालयांमध्ये हाय अलर्ट आणि आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली असून, रेल्वे सेवाही निलंबित करण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने या हल्ल्यांचा निषेध करत याला दहशतवाद म्हटले आहे, तर बीएलएने हा बलुच स्वातंत्र्यासाठीचा निर्णायक लढा असल्याचे जाहीर केले आहे. खनिजांनी समृद्ध असूनही गरीबी आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनामुळे हा प्रदेश गेल्या अनेक दशकांपासून अशांत आहे.