Indus Water Treaty: संयुक्त राष्ट्रांमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या 'रक्त आणि पाणी आता एकत्र वाहणार नाही,' या घोषणेनंतर भारताने सिंधू पाणी कराराबद्दल मोठे विधान केले आहे. भारताने पाकिस्तानवर सिंधू पाणी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये, भारताने पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रचाराला खोडून काढले. तसेच पाकिस्तानने तीन युद्धे करून आणि भारतावर हजारो दहशतवादी हल्ले करून या कराराच्या भावनेचे उल्लंघन केले असल्याचा उल्लेखही यावेळी भारताने केला. पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्यांद्वारे भारतीयांचे रक्त सांडले आहे. त्यामुळे आपल्या नागरिकांचे रक्त सांडणाऱ्या पाकिस्तानला पाणी देता येणार नाही, असंही भारताने स्पष्ट केलं आहे.
संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पार्वतानेनी हरीश यांनी शुक्रवारी सांगितले की, 'सिंधू पाणी कराराबाबत पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने पसरवलेल्या चुकीच्या माहितीला उत्तर देणे आम्हाला भाग पडले आहे. भारत हा एक अपस्ट्रीम देश असल्याने नेहमीच जबाबदारीने वागला आहे, असे हरीश यांनी स्लोव्हेनियाच्या स्थायी मिशनने आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीला संबोधित करताना सांगितले. या बैठकीचा विषय 'सशस्त्र संघर्षात पाणी सुरक्षा - नागरी जीवनाचे संरक्षण' होता.
पाकिस्तानचा भारताच्या सद्भावनेवर हल्ला -
पार्वतानेनी हरीश यांनी यावेळी म्हटलं की, पाकिस्तान गेल्या 65 वर्षांपासून सिंधू पाणी कराराच्या सद्भावनेवर हल्ला करत आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 1960 चा सिंधू पाणी करार तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. भारताने 65 वर्षांपूर्वी सद्भावनेने सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी केली होती. कराराच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की तो 'सद्भावना आणि मैत्रीच्या भावनेने' करण्यात आला होता. हरीश म्हणाले की, या साडेसहा दशकांमध्ये, पाकिस्तानने भारतावर तीन युद्धे आणि हजारो दहशतवादी हल्ले करून कराराच्या भावनेचे उल्लंघन केले आहे.'
हेही वाचा- गद्दार ज्योती मल्होत्राची फॉरेन्सिक तपासणीत पोलखोल; दानिशसह अनेक पाक अधिकाऱ्याशी कोडवर्डमध्ये चॅटिंग
गेल्या चार दशकांत पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 20 हजारहून अधिक भारतीयांनी आपले प्राण गमावले आहेत, त्यापैकी सर्वात अलीकडील हल्ला पहलगाममधील पर्यटकांवर झालेला क्रूर दहशतवादी हल्ला होता. या संपूर्ण काळात भारताने असाधारण संयम आणि उदारता दाखवली आहे, तरीही पाकिस्तानने भारतात पुरस्कृत केलेला सीमापार दहशतवाद नागरिकांचे जीवन, धार्मिक सौहार्द आणि आर्थिक समृद्धीला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरूच आहे, असंही हरीश यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा- भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतरही 'मुल्ला जनरल' असीम मुनीरला मोठी भेट! फील्ड मार्शलपदी प्रमोशन!
पाकिस्तानकडून वारंवार सिंधू पाणी कराराचे उल्लंघन -
तथापि, या बैठकीत हरीश यांनी पाकिस्तानच सिंधू पाणी कराराचे उल्लंघन करत असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय, शुक्रवारी झालेल्या एका आणखी बैठकीत हरीश यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 'सशस्त्र संघर्षादरम्यान नागरिकांचे संरक्षण' या विषयावर झालेल्या खुल्या चर्चेत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी पाकिस्तानच्या ढोंगीपणाचा निषेध केला.