Bill Gates: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी वादग्रस्त उद्योगपती जेफ्री एपस्टाईनशी असलेल्या संबंधांबाबत अखेर मौन सोडले आहे. एपस्टाईन फाईल्समध्ये नाव आल्यानंतर आणि नवीन कागदपत्रे प्रसिद्ध झाल्यानंतर, गेट्स यांनी 'गेट्स फाउंडेशन'च्या कर्मचाऱ्यांची जाहीरपणे माफी मागितली आहे. एका अंतर्गत टाउन हॉल मीटिंगमध्ये बोलताना त्यांनी मान्य केले की, एपस्टाईनसोबत वेळ घालवणे आणि फाउंडेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यात सामील करणे ही त्यांच्या आयुष्यातील एक "मोठी चूक" होती.
रशियन महिलांसोबतच्या अफेअर्सची दिली कबुली
या बैठकीदरम्यान बिल गेट्स यांनी धक्कादायक खुलासा केला. एपस्टाईन फाईल्समध्ये नमूद केल्याप्रमाणे दोन रशियन महिलांसोबत आपले अफेअर्स असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, त्यांनी हे स्पष्टपणे नमूद केले की, हे संबंध एपस्टाईनच्या कोणत्याही पीडितांशी संबंधित नव्हते. अमेरिकेच्या न्याय विभागाने अलीकडेच काही फोटो प्रसिद्ध केले होते, ज्यामध्ये गेट्स काही महिलांसोबत दिसत होते. या फोटोंमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत होती, ज्याचे उत्तर त्यांनी आता दिले आहे.
"काहीही बेकायदेशीर केले नाही"; गेट्स यांचा दावा
आपल्या स्पष्टीकरणात गेट्स यांनी स्वतःचा बचाव करण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, "मी कधीही काहीही बेकायदेशीर केले नाही आणि मला अशा कोणत्याही बेकायदेशीर गोष्टी घडताना दिसल्या नाहीत." तसेच, त्यांनी कधीही एपस्टाईनच्या पीडितांसोबत किंवा त्याच्या आजूबाजूला असलेल्या महिलांसोबत वेळ घालवला नसल्याचा दावाही केला. तरीही, आपल्या चुकीच्या निर्णयामुळे ज्यांना नाहक त्रास सहन करावा लागला, त्या सर्वांची त्यांनी माफी मागितली आहे.
हेही वाचा - Unique Railway Station : ना एन्ट्री गेट, ना तिकीट खिडकी, ना बाहेर जाण्याचा रस्ता! इथं जाण्या-येण्यासाठी वाहनही रेल्वेच! पण माणसं नेमकी जातात तरी कुठं?
तपासातून समोर आलेले फोटो आणि पुरावे
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमध्ये बिल गेट्स आणि एपस्टाईन यांच्या अनेक बैठकांचे फोटो आहेत. या फोटोंमध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक काही महिलांसोबत पोज देताना दिसत आहेत, मात्र या महिलांचे चेहरे अस्पष्ट करण्यात आले होते. या पुराव्यांमुळे गेट्स यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून, फाउंडेशनच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, ज्यावर पडदा टाकण्यासाठी त्यांनी ही जाहीर माफी मागितली आहे.