Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. "मला नोबेल शांतता पुरस्कार मिळाला नाही, म्हणून आता मला ग्रीनलँड हवा आहे," अशा शब्दांत ट्रम्प यांनी नॉर्वेच्या पंतप्रधानांना पत्राद्वारे थेट इशारा दिला आहे. या पत्रामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली असून ट्रम्प यांचे 'अमेरिका फर्स्ट' धोरण आता आक्रमक विस्तारवादाकडे झुकताना दिसत आहे.
शांततेचा आता माझ्यासाठी अर्थ नाही
नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोअर यांनी सोमवारी (19 जानेवारी 2026) पुष्टी केली की, त्यांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा एक विशेष संदेश मिळाला आहे. या पत्रात ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, 'नोबेल पुरस्कार न मिळाल्याने ते आता जागतिक शांततेसाठी बांधील नाहीत. मी 8 पेक्षा जास्त युद्धे थांबवली, तरीही नॉर्वेने मला नोबेल दिले नाही. त्यामुळे आता शांततेचा विचार करण्याची जबाबदारी मला वाटत नाही,' असे ट्रम्प यांनी नमूद केले. पुरस्कार नाकारल्यामुळे जागतिक घडामोडींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलल्याचे ट्रम्प यांनी पत्रात सूचित केले आहे.
हेही वाचा- Greenland Crisis: ट्रम्पचा ग्रीनलँड डाव, युरोपवर टॅरिफची तलवार; मात्र भारताला होणार मोठा फायदा, जाणून घ्या
ग्रीनलँड आणि डेन्मार्कवर निशाणा
दरम्यान, ट्रम्प यांनी केवळ नॉर्वेवर टीका केली नाही, तर ग्रीनलँडच्या मालकी हक्कावरून डेन्मार्कलाही लक्ष्य केले आहे. डेन्मार्क रशिया किंवा चीनपासून ग्रीनलँडचे संरक्षण करू शकत नाही, असा दावा ट्रम्प यांनी केला. 'डेन्मार्ककडे ग्रीनलँडच्या मालकीचे कोणतेही लेखी पुरावे नाहीत. शेकडो वर्षांपूर्वी त्यांचे एक जहाज तिथे उतरले म्हणून ती जागा त्यांची होत नाही, तिथे आमचीही जहाजे उतरत असतं,' असे ट्रम्प यांनी पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा - UAE President India Visit : मैत्रीचं अतुट नातं! पंतप्रधान मोदींनी प्रोटोकॉल तोडून केलं UAE च्या अध्यक्षांच स्वागत
नाटो आणि 'अमेरिका फर्स्ट'चा नवा टप्पा
ट्रम्प यांची नाटो (NATO) वरील भूमिका आता अधिक कठोर झाली आहे. "अमेरिकेने अनेक दशके नाटोचे पालनपोषण केले, आता नाटोने अमेरिकेसाठी काम करण्याची वेळ आली आहे," असे त्यांनी बजावले. जोपर्यंत ग्रीनलँड पूर्णपणे अमेरिकेच्या ताब्यात येत नाही, तोपर्यंत जग सुरक्षित राहणार नाही, असा थेट संदेश ट्रम्प यांनी या पत्रातून दिला आहे. दरम्यान, नोबेल समिती ही स्वतंत्र असून तिचा नॉर्वेजियन सरकारशी संबंध नसतो, असे स्पष्टीकरण नॉर्वेकडून वारंवार दिले जात असले तरी ट्रम्प मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.