India to Bhutan Railway: तुम्हाला परदेशात जायचं म्हटलं की आठवतो तो विमान प्रवास आणि विमान प्रवास म्हटलं तर महागडी तिकिटे असतात. मात्र आता परदेशात जाण्यासाठी विमान प्रवासाची गरज भासणार नाही. आता तुम्हाला रेल्वेने परदेशात जाता येणार आहे. भारत आणि भूतान यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. सरकारने सोमवारी 4 हजार 33 कोटींच्या दोन रेल्वे प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. यामुळे दोन्ही देशामधील संपर्क, व्यापार आणि पर्यटन वाढण्यास मदत होणार आहे. याचा अर्थ आता तुम्हाला परदेशात जाण्यासाठी विमान प्रवासाची गरज असणार नाही.
भारत-भूतान रेल्वे मार्ग
सध्या पश्चिम बंगालमधील हासिमारापर्यंत धावणारी रेल्वे आता भूतानमधील गेलेफूपर्यंत धावणार आहे. यासाठी आसाममधील कोक्राझार ते भूतानमधील गेलेफूपर्यंत 69 किलोमीटरचा रेल्वे मार्ग बांधला जाणार आहे. यासाठी 3 हजार 456 कोटींचा खर्च केला जाणार आहे. दुसऱ्या प्रकल्पात पश्चिम बंगालमधील बनारहाट ते भूतानमधील समत्से या दरम्यान 20 किलोमीटर लांब रेल्वे मार्ग बांधला जाणार आहे. यासाठी 577 कोटींचा खर्च येणार आहे.
हेही वाचा: Trump Movie Tarrif: डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक टॅरिफ बॉम्ब! परदेशी चित्रपटांवर 100 टक्के कर लावण्याची घोषणा
प्रकल्पामुळे दोन्ही देशांना फायदा होणार
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, "भारत आणि भूतानमधील संबंध मजबूत होत आहेत. भारत हा भूतानचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारतीय बंदरे भूतानच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. समत्से आणि गेलेफू ही प्रमुख निर्यात-आयात केंद्रे आहेत. आता भारताकडून या आर्थिक केंद्रांना चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. भूतानमध्ये बांधला जाणारा हा पहिला रेल्वे प्रकल्प आहे, जो भारताला थेट जोडतो. यामुळे वाहतूक सोपी होईल, तसेच पर्यटन वाढल्यामुळे रोजगारही निर्माण होईल."
हा प्रकल्प द्विपक्षीय सामंजस्य कराराच्या माध्यमातून राबवला जात आहे. यात कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नाही. या निर्णयामुळे चीनला थेट संदेश मिळाला आहे की, भारत आणि भूतान यांच्यातील संबंध आणखी मजबूत होत आहेत असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारत आणि भूतानमधील नवीन रेल्वे प्रकल्पाबाबत बोलताना म्हटले.