Celebi प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
नवी दिल्ली: भारत सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलून तुर्की ग्राउंड हँडलिंग कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे. त्यानंतर लवकरच, मुंबई विमानतळावरील कर्मचारी आणि मालमत्तेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आता भारतीय कंपनी इंडोथाईकडे सोपवण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. त्यानंतर आता भारताने तुर्कीविरोधा कठोर निर्णय घेणं सुरू केलं आहे. आतापर्यंत, मुंबई विमानतळावर सुमारे 70% ग्राउंड हँडलिंग सेवा सेलेबीकडे होत्या. यामध्ये प्रवासी सेवा, भार नियंत्रण, उड्डाण ऑपरेशन्स, कार्गो आणि पोस्टल सेवा, गोदाम ऑपरेशन्स आणि पूल ऑपरेशन्स यासारख्या महत्त्वाच्या सेवांचा समावेश होता. या निर्णयामुळे विमानतळांच्या कामकाजात मोठा बदल झाला आहे.
राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत कारवाई -
सरकारने गुरुवारी पुष्टी केली की, सेलेबीला भारतात काम करण्यासाठी आवश्यक सुरक्षा मंजुरी दिली जाणार नाही. या मंजुरीशिवाय, भारतात विमानतळांशी संबंधित संवेदनशील सेवा प्रदान करणे कायदेशीररित्या शक्य नाही. अलीकडील संघर्षात पाकिस्तानने तुर्की ड्रोनचा वापर केल्याच्या बातम्या समोर आल्या असताना ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांनी भारताविरुद्धच्या वक्तव्यांमध्ये चांगल्या आणि वाईट काळात पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता.
हेही वाचा - भारताच्या या मित्राने दिली शत्रूला साथ! पाकिस्तानची अर्थव्यवस्था 50 वर्षांसाठी मजबूत होणार?
सरकारच्या निर्णयाला सेलेबीचे न्यायालयात आव्हान -
दरम्यान, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या भारतातील प्रमुख विमानतळांवर गेल्या दशकाहून अधिक काळ ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवणाऱ्या सेलेबी एव्हिएशनने आता सरकारच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 16 मे रोजी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत कंपनीने म्हटले आहे की, कोणतेही स्पष्ट कारण न देता केवळ राष्ट्रीय सुरक्षेचा उल्लेख करणे कायदेशीररित्या योग्य नाही.
हेही वाचा - व्यापाऱ्यांनी शिकवला तुर्कीला धडा! तुर्की सफरचंदांऐवजी काश्मिरी सफरचंद खरेदी करण्याचा घेतला निर्णय
कंपनीने आपल्या याचिकेत असेही म्हटले आहे की या निर्णयामुळे 3791 नोकऱ्यांवर परिणाम होईल आणि गुंतवणूकदारांचा विश्वासही डळमळीत होईल. सेलेबीच्या मते निर्णय घेण्यापूर्वी त्यांना कोणतीही चेतावणी किंवा संधी देण्यात आली नाही. सरकारच्या या निर्णयानंतर, बीसीएएसने सेलेबी एअर सर्व्हिस एएसशी संबंधित सर्व भारतीय युनिट्सच्या सेवा तात्काळ प्रभावाने निलंबित केल्या आहेत. यामध्ये सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (CASI), सेलेबी GH इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (CGHI), सेलेबी NAS एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सेलेबी दिल्ली कार्गो टर्मिनल मॅनेजमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सेलेबी GS चेन्नई प्रायव्हेट लिमिटेड (CGSC) यांचा समावेश आहे.