Monday, March 09, 2026 08:39:29 AM

Amazon Data Center Attack: UAE वर इराणी क्षेपणास्त्रांचा पाऊस; अमेझॉनच्या डेटा सेंटरला भीषण आग

इराणकडून झालेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांदरम्यान युएईमधील अमेझॉनच्या एका प्रमुख डेटा सेंटरवर संशयास्पद वस्तू आदळल्याने भीषण आग लागली.

amazon data center attack uae वर इराणी क्षेपणास्त्रांचा पाऊस अमेझॉनच्या डेटा सेंटरला भीषण आग

Amazon Data Center Attack: संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि इराणमधील वाढत्या तणावादरम्यान अमेझॉनच्या क्लाउड युनिटला (AWS) मोठा फटका बसला आहे. इराणकडून झालेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांदरम्यान युएईमधील अमेझॉनच्या एका प्रमुख डेटा सेंटरवर संशयास्पद वस्तू आदळल्याने भीषण आग लागली. पहाटे 4:30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे सुविधेचे मोठे नुकसान झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेचा थेट संबंध इराणी हल्ल्यांशी आहे का, याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही.

दुबई आणि अबू धाबी लक्ष्य; जीवितहानीसह मालमत्तेचे नुकसान
इराणने अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून युएईमधील विमानतळ, बंदरे आणि निवासी भागांना लक्ष्य केले आहे. दुबईमध्ये एका पंचतारांकित रिसॉर्टला आग लागली असून जगातील सर्वात उंच इमारतीसह शहराच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. या आक्रमणात मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अबू धाबी विमानतळावर झालेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. या संकटामुळे युएईमधील जनजीवन विस्कळीत झाले असून सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आखाती देश एकवटले; GCC ची आपत्कालीन बैठक
इराणी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आखाती सहकार्य परिषदेच्या (GCC) 6 सदस्य देशांनी रविवारी तातडीची व्हिडिओ परिषद घेतली. या बैठकीत नागरिकांचे संरक्षण आणि प्रदेशाच्या सुरक्षिततेसाठी 'सर्व आवश्यक उपाययोजना' करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिषदेने स्पष्ट केले की, गरज पडल्यास या आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्याचा पर्याय खुला आहे. जागतिक आर्थिक स्थिरतेसाठी आखाती देशांमधील शांतता अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत, GCC ने इराणला हे हल्ले तात्काळ थांबवण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा - Security Alert In India: युद्ध मध्यपूर्वेत, अलर्ट भारतात! इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाचा राज्यांना 'हाय अलर्ट'

'तुमचे युद्ध शेजाऱ्यांशी नाही'; UAE ची तीव्र प्रतिक्रिया: 
या हल्ल्यानंतर युएईने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी इराणच्या कृत्याचा निषेध करत त्यांना शहाणपणाने वागण्याचा सल्ला दिला आहे. राजनैतिक सल्लागार अन्वर गर्गश यांनी या हल्ल्यांना इराणची 'गंभीर चूक' म्हटले असून, यामुळे इराण जागतिक स्तरावर एकटा पडेल असा इशारा दिला आहे. "तुमचे युद्ध तुमच्या शेजाऱ्यांसोबत नाही," अशा शब्दांत गर्गश यांनी इराणला जबाबदारीने वागण्याचे आवाहन करत परिस्थिती अधिक चिघळण्यापूर्वी विचार करण्याची तंबी दिली आहे.
 


सम्बन्धित सामग्री