चितगाव : काही दिवसांपूर्वी कामाच्या पद्धतीवरुन नाराजी व्यक्त करत इस्कॉनच्या मुख्यालयाने बांगलादेशमधील चितगाव येथे इस्कॉनचे प्रशासक म्हणून कार्यरत असलेल्या चिन्मय कृष्ण दास यांना पदमुक्त केले. पण इस्कॉनने त्यांच्याशी असलेले संबंध तोडलेले नाहीत. कठीण प्रसंगात ठामपणे चिन्मय कृष्ण दास यांच्या पाठिशी राहणार आहे, असे इस्कॉनच्या मुख्यालयाकडून जाहीर करण्यात आले. याआधी इस्कॉनच्या मुख्यालयाने चिन्मय कृष्ण दास यांच्याशी संबंध नाही अशी भूमिका घेतली होती. ही भूमिका अवघ्या काही तासांत बदलण्यात आली आहे. चिन्मय कृष्ण दास यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण व्हायला हवे, त्यांना अटक झाली असली तरी स्वतःची बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी; अशी भूमिका इस्कॉनच्या मुख्यालयाकडून घेण्यात आली आहे.
बांगलादेशमध्ये हिंसक घटना सुरू झाल्या. हिंसा करणाऱ्यांना आळा घालण्याच्या निमित्ताने सक्रीय झालेल्या बांगलादेशच्या सैन्याने पंतप्रधान शेख हसिना यांना देश सोडण्यास भाग पाडले. बदललेल्या परिस्थितीत बांगलादेशमधील हिंदूंवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. बांगलादेशमधील अनेक मंदिरांची तोडफोड करण्यात आली. हिंदू संकटात असल्याची जाणीव झाल्यावर चितगाव येथे इस्कॉनचे प्रशासक म्हणून कार्यरत असलेल्या चिन्मय कृष्ण दास यांनी निराश झालेल्या दहशतीच्या वातावरणात वावरत असलेल्या हिंदूंना संघटीत करायला सुरुवात केली. संघटीत झालेल्या हिंदूंनी सरकारकडे विविध मागण्या करायला सुरुवात केली.
अल्पसंख्यांकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्यांवर खटला चालवण्यासाठी न्यायाधिकरणाची स्थापना, पीडितांना भरपाई आणि पुनर्वसन, अल्पसंख्याक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची स्थापना, शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहांमध्ये अल्पसंख्याकांसाठी प्रार्थनास्थळे आणि प्रार्थनागृहे या मागण्यांचा समावेश आहे हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन वेल्फेअर ट्रस्ट तयार करणे, त्यांना प्राधान्य देणे, मालमत्ता हस्तांतरण कायदा लागू करणे, पाली आणि संस्कृत शिक्षण मंडळाचे आधुनिकीकरण आणि दुर्गापूजेला पाच दिवसांची सुट्टी या प्रमुख मागण्या हिंदूंनी केल्या. या मागण्या करण्यासाठी काढण्यात आलेल्या एका मोर्चावेळी चितगावमधील न्यू मार्केट चौकात बांगलादेशच्या राष्ट्रध्वजावर भगवा ध्वज फडकावल्याप्रकरणी चिन्मय कृष्ण दास आणि इतर 18 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात आता दास यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेची माहिती मिळाल्यानंतर भारत सरकारने तसेच भारत आणि बांगलादेशमधील हिंदू संघटनांनी चिन्मय कृष्ण दास यांच्या सुटकेची मागणी केली आहे.
चिन्मय कृष्ण दास यांची वकिली करणाऱ्या एका वकिलाची बांगलादेशमध्ये हत्या झाली आहे. यामुळे चिन्मय कृष्ण दास यांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पण इस्कॉनने त्यांच्या पाठिशी असल्याचे जाहीर केले आहे. भारत सरकार तसेच भारत आणि बांगलादेशमधील हिंदू संघटनांनी चिन्मय कृष्ण दास यांच्या अभिवक्ती स्वातंत्र्याचे रक्षण व्हायला हवे अशी मागणी केली आहे.