Saturday, March 07, 2026 03:05:16 AM

T20 World Cup: 13 हजार नेपाळी चाहत्यांना 'त्या' फिरकीपटूने पाजले पाणी; इटलीच्या विजयाचा नायक ठरला एक सामान्य पिझ्झा विक्रेता खेळाडू, वाचा संघर्षमय कहाणी

क्रिशन कालुगामागेच्या भेदक गोलंदाजीसह जस्टीन आणि अँथनी मोस्का यांच्या नाबाद अर्धशतकांनी इटलीने 124 धावांचे लक्ष्य अवघ्या 12.4 षटकांत पार केले.

t20 world cup 13 हजार नेपाळी चाहत्यांना त्या फिरकीपटूने पाजले पाणी इटलीच्या विजयाचा नायक ठरला एक सामान्य पिझ्झा विक्रेता खेळाडू वाचा संघर्षमय कहाणी

मुंबई: क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी एक अजब योगायोग पाहायला मिळाला. सव्वातेरा हजार नेपाळी चाहत्यांच्या अलोट गर्दीने आणि समर्थनाने दुमदुमणारे स्टेडियम इटलीच्या विजयानंतर एकाएकी शांत झाले. 'अझुरी'च्या या ऐतिहासिक विजयाचा नायक ठरला तो म्हणजे इटलीच्या लुक्का शहरात पिझ्झा विकून आपला उदरनिर्वाह करणारा क्रिशन कालुगामागे. टी-20 विश्वचषकाच्या या रोमहर्षक लढतीत इटलीने नेपाळचा 10 गडी राखून धुव्वा उडवला आणि क्रिकेट विश्वाला त्याची दखल घेण्यास भाग पाडले.

सामन्याच्या सुरुवातीला नेपाळने पॉवरप्लेमध्ये 1 बाद 45 अशी आश्वासक सुरुवात केली होती, पण इटलीच्या फिरकीपुढे त्यांचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. मूळचा श्रीलंकन असलेल्या पण 16 व्या वर्षी इटलीत स्थायिक झालेल्या क्रिशन कालुगामागे याने त्याच्या 'लेगब्रेक गुगली'ने नेपाळच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. सोमवार ते शनिवार पिझ्झा विकण्याचे काम करणाऱ्या क्रिशनने मैदानात मात्र नेपाळला गारद करत आणि महत्त्वपूर्ण 3 मोहरे टिपले. त्याच्या या भेदक माऱ्यामुळे नेपाळचा संपूर्ण संघ 123 धावांतच गारद झाला.

हेही वाचा: Hardik Pandya fell on Gerhard Erasmus : नामिबियाच्या कर्णधारावर हार्दिक कोसळला, गेरहार्ड इरास्मसने काय केलं पाहा; मजेदार क्षण व्हायरल

नेपाळने दिलेल्या 124 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इटलीच्या फलंदाजांनी जणू 'आगीशी खेळ' केला. जस्टीन आणि अँथनी या मोस्का बंधूंनी सलामीला येत नेपाळच्या गोलंदाजांचा अक्षरशः सराव घेतला. पॉवरप्लेमध्ये नेपाळने 45 धावा केल्या होत्या, तिथे इटलीने तब्बल 68 धावा कुटून काढल्या. इटलीचे अर्धशतक अवघ्या 24 चेंडूंत पूर्ण झाले, तर विजयाचे शतक 65 व्या चेंडूवर गाठले गेले. नेपाळच्या फलंदाजांना संपूर्ण डावात केवळ तीन षटकार मारता आले, तर इटलीच्या सलामीवीरांनी नऊ षटकार आणि आठ चौकारांची जोरदार फटकेबाजी करत वानखेडेवर चौफेर धुव्वा उडवला.

हा विजय केवळ आकड्यांचा नव्हता, तर तो जिद्दीचा होता. जस्टीन (नाबाद 60) आणि अँथनी (नाबाद 62) यांनी 12.4 षटकांतच सामना संपवून नेपाळच्या चाहत्यांच्या आशांवर पाणी फेरले. विजयाची धाव पूर्ण होताच अँथनीने मैदानात केलेला जल्लोष आणि नाच, हे त्या संघर्षाचे फळ होते जे हा संघ अनेक वर्षांपासून इटलीसारख्या फुटबॉलप्रेमी देशात क्रिकेटसाठी करत आहे. सचिन तेंडुलकर स्टँडमध्ये बसलेल्या त्या मोजक्याच इटालियन चाहत्यांचे संघाने मानलेले आभार क्रीडाप्रेमींचे मन जिंकून गेले.

क्रिशन कालुगामागेची कहाणी या विजयाला अधिकच प्रेरणादायी बनवते. दुखापतीमुळे करिअर धोक्यात आले असताना लेगस्पिनर बनण्याचा घेतलेला निर्णय आणि परदेशात पोटाची खळगी भरण्यासाठी पिझ्झा विकताना क्रिकेटचे स्वप्न जिवंत ठेवणे, हे कोणत्याही खेळाडूसाठी 'अग्निपरीक्षा'च असते. आज वानखेडेवर प्रेक्षकांच्या साक्षीनं त्या संघर्षाचं सोनं झालं. इटलीचा हा विजय म्हणजे क्रिकेटमध्ये लहान-मोठा कोणीही नसतो, तर जो मैदानात नशीब आजमवतो तोच 'सिकंदर' ठरतो, याचे जिवंत उदाहरण आहे.

हेही वाचा: Railway Kavach System: रेल्वेने लाल सिग्नल ओलांडला तरी घाबरू नका; भारतीय रेल्वेची 'कवच' प्रणाली करणार रक्षण, काय आहे तंत्रज्ञान जाणून घ्या


सम्बन्धित सामग्री