Monday, November 17, 2025 12:55:24 AM

Saudi Arabia Abolishes Kafala : मोठी बातमी! सौदी अरेबियामध्ये 50 वर्षांची 'कफाला सिस्टम' संपुष्टात; 25 लाख भारतीयांना दिलासा

1950 च्या दशकात सुरू झालेल्या या व्यवस्थेनुसार, परदेशी कामगारांवर त्यांच्या नियोक्त्याचे (Employer) पूर्ण नियंत्रण असायचे. यामुळे मालकांकडून परदेशी कामगारांवर अन्याय होण्याचे प्रमाण मोठे होते.

saudi arabia abolishes kafala  मोठी बातमी सौदी अरेबियामध्ये 50 वर्षांची कफाला सिस्टम संपुष्टात 25 लाख भारतीयांना दिलासा

Saudi Arabia Abolishes Kafala : सौदी अरेबियाने 50 वर्षांपूर्वीची 'कफाला' (संरक्षक) प्रणाली या महिन्यात अधिकृतपणे संपुष्टात आणली आहे. ही व्यवस्था आधुनिक काळातील गुलामगिरी म्हणून ओळखली जात होती. या निर्णयामुळे सुमारे 1.3 कोटी परदेशी कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे, ज्यात जवळपास 25 लाख भारतीयांचा समावेश आहे. सौदी अरेबियाची जागतिक प्रतिमा सुधारणे आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे, हे या निर्णयाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

'कफाला' प्रणाली नेमकी काय होती?
तरुणांना चांगल्या नोकरीचे प्रलोभन दाखवून सौदी अरेबियान नेले जाते. तिथे गेल्यानंतर त्यांचा पासपोर्ट जमा करून, त्यांना गुलामी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या अनेक घटना तुम्ही आजवर ऐकल्या किंवा वाचल्या असतील. पैसे कमवण्याच्या आशेने या देशात गेलेले भारतीय कामगार तिकडेच अडकून पडल्याचे अनेक प्रकारही समोर आलेले आहेत. या सर्व घटनांना कफाला प्रणालीबरोबर जोडण्यात आले आणि त्यावर चित्रपटही काढण्यात आले आहे. मुळात ‘कफाला’ हा शब्द अरबी भाषेतील असून, त्याचा अर्थ ‘प्रायोजकत्व’असा होतो. या व्यवस्थेनुसार प्रत्येक परदेशी कामगार एखाद्या स्थानिक नियोक्त्याशी थेटपणे जोडलेला असतो.

1950 च्या दशकात सुरू झालेल्या या व्यवस्थेनुसार, परदेशी कामगारांवर त्यांच्या नियोक्त्याचे (Employer) पूर्ण नियंत्रण असायचे. प्रत्येक परदेशी कामगार एका 'कफील'शी (संरक्षक) जोडलेला असायचा, जो त्याच्या नोकरी, पगार आणि राहण्याच्या जागेवरही नियंत्रण ठेवत असे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, हा नियोक्ता कामगाराचा पासपोर्ट स्वतःकडे ठेवत असे आणि नोकरी कधी बदलायची किंवा देश कधी सोडायचा, हे तोच ठरवत असे. अत्यंत भयानक म्हणजे, जोपर्यंत तो कफील परवानगी देत नाही, तोपर्यंत कामगार आपल्या शोषणाविरुद्ध तक्रार देखील करू शकत नव्हते. ॲमनेस्टी इंटरनॅशनल सारख्या संस्थांनी या सिस्टमला मानवी तस्करीचे एक रूप म्हणूनही पाहिले होते.

कफाला प्रणालीचा इतिहास आणि उद्देश
- 1950 च्या दशकात आखाती देशांमधील तेल उद्योग अत्यंत तेजीत आला.
- या देशांमधील लोकसंख्या कमी असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात कामगारांचा तुटवडा भासू लागला.
- परदेशातून कामगार आणण्यासाठी आखाडी देशांनी प्रयत्न सुरू केले.
- यादरम्यान परदेशी कामगारांच्या हालचाली आणि त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणेदेखील आवश्यक होते. त्यासाठी सौदी अरेबियाने कफाला प्रणालीची सुरुवात केली.
- या प्रणालीमध्ये प्रायोजकाला परदेशी कामगाराचा रोजगार, निवास आणि कायदेशीर स्थितीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचे अधिकार दिले.
- कफाला प्रणालीच्या अंतर्गत कोणत्याही परदेशी कामगाराने सौदी अरेबियात प्रवेश केल्यास त्याला तेथील कायदे आणि नियम लागू होतात.

हेही वाचा - US Truck Crash: अमेरिकेत भारतीय ट्रक चालकाने अनेक गाड्यांना उडवलं; 3 जणांचा मृत्यू; पहा थरकाप उडवणारे दृश्य

अशा प्रणालीमुळे आपोआप शोषण सुरू झाले
- कफाला प्रणालीमुळे कामगारांना पूर्णपणे प्रायोजकांवर अवलंबून राहावे लागत असल्याने ते शोषणाचे बळी ठरत होते.
- त्या संदर्भातील अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर काही मानवाधिकार संघटनांनी कफाला प्रणालीविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली. या व्यवस्थेमुळे परदेशी कामगारांचे मूलभूत स्वातंत्र्य आणि हक्क हिरावले जात असल्याची आणि ही व्यवस्था आधुनिक गुलामगिरीचे रूप असल्याची टीकाही त्यांनी केली.
- विशेषत: घरकाम करणाऱ्या महिलांना या प्रणालीमुळे सर्वाधिक त्रस्त होत्या. त्यांना अनेकदा जास्त काम, एकाकीपणा आणि शारीरिक किंवा भावनिक अत्याचाराला सामोरे जावे लागत असल्याचे मानवाधिकार संघटनांनी म्हटले होते.

महिलांची स्थिती होती सर्वात बिकट
या कफाला प्रणालीत महिला कामगारांची स्थिती सर्वात वाईट होती. अनेक भारतीय महिलांनी शारीरिक आणि लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या होत्या. 2017 मध्ये गुजरात आणि कर्नाटकच्या महिलांसोबत झालेल्या अमानवीय अत्याचाराची प्रकरणे तर भारत सरकारच्या हस्तक्षेपानंतरच सोडवली गेली होती. अशा प्रकारे कामगारांच्या जीवनावर पूर्ण नियंत्रण ठेवणारी ही व्यवस्था अखेर क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या 'व्हिजन 2030' सुधारणा योजनेचा भाग म्हणून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय दबाव, मानवाधिकार संघटनांचे अहवाल आणि परदेशी नागरिकांचा वाढता असंतोष ही या निर्णयामागील प्रमुख कारणे आहेत. मात्र, कुवेत, ओमान, लेबनान आणि कतार यांसारख्या काही देशांमध्ये ही व्यवस्था अजूनही सुरू आहे.

सौदी अरेबियात स्थलांतरित कामगारांची संख्या किती?
सौदी अरेबियामध्ये स्थलांतरित कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, सौदीत सुमारे एक कोटी 34 लाख परदेशी कामगार कामानिमित्त स्थायिक झाले आहेत. या कामगारांची संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 42 टक्के इतकी आहे. त्यातील बहुतेक कामगार भारत, बांगलादेश, नेपाळ व फिलिपिन्स यांसारख्या देशांतून आलेले आहेत. दशकानुदशके त्यांच्या कमाईमुळे त्यांची मायदेशातील कुटुंबे आणि अर्थव्यवस्थांना आधार मिळाला आहे. सौदी अरेबियातील बहुतांश परदेशी कामगार हे बांधकाम, घरगुती काम, शेती आणि कमी पगाराच्या इतर क्षेत्रांत काम करतात. त्यांनी मायदेशी पाठवलेला पैसा सौदी अरेबियाच्या आर्थिक स्थिरतेतही महत्त्वपूर्ण योगदान देतो.

हेही वाचा - Countries Where Poverty Is Illegal: या देशांमध्ये गरीब असणं म्हणजे गुन्हा! शोधूनही सापडत नाहीत भिकारी


सम्बन्धित सामग्री