Plane Caught Fire: ब्राझीलमधील साओ पाउलो विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच 'डेल्टा एअर लाइन्स'च्या एका विमानाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अटलांटाकडे जाणाऱ्या या 'एअरबस A330-300' मॉडेलच्या विमानात 272 प्रवासी आणि 14 कर्मचारी होते. सुदैवाने, वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे विमानाचे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले असून मोठी जीवितहानी टळली आहे.
उड्डाणानंतर अवघ्या 9 मिनिटांत आगीचे तांडव
ही घटना रविवार, 29 मार्च 2026 रोजी घडली. 'गारुल्होस आंतरराष्ट्रीय विमानतळा'वरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमानाच्या डाव्या पंखाजवळील इंजिनमधून आगीच्या ठिणग्या उडू लागल्या. रात्रीच्या गडद आकाशात विमानाच्या पंखाला लागलेली आग स्पष्टपणे दिसत होती. फ्लाईट ट्रॅकिंग डेटानुसार, आग लागल्यानंतर हे विमान हवेत केवळ 9 मिनिटांहून थोडा अधिक काळ होते आणि त्यानंतर तातडीने धावपट्टीवर परतवण्यात आले.
ATC कडून सावधगिरीचा इशारा
विमानाच्या इंजिनने पेट घेतल्याचे लक्षात येताच 'एअर ट्रॅफिक कंट्रोल' (ATC) मधील अधिकाऱ्यांनी तातडीने वैमानिकांना संदेश दिला. "डेल्टा 104, तुमच्या विमानाच्या पंखाला आग लागली आहे," असा इशारा मिळताच वैमानिकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत विमान परत उतरवण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान इंजिनचे काही छोटे भाग (डेब्रिस) जमिनीवर पडल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी पाहिले.
प्रवासी भयभीत; केबिनमध्ये किंचाळ्यांचा आवाज
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये विमानातील भीषण परिस्थिती दिसून येत आहे. उड्डाणानंतर लगेचच खिडकीबाहेर आगीचे लोळ दिसू लागल्याने विमानाच्या केबिनमध्ये प्रवाशांनी एकच आक्रोश केला. प्रवासी भीतीने किंचाळतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. विमान जमिनीवर उतरताच विमानतळावरील अग्निशमन दल आणि बचाव पथकाने तत्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
हेही वाचा - Boys Fight on Train Track : मुलीवरून राडा! स्थानकातील रेल्वे ट्रॅकवर दोन तरुणांची हाणामारी; समोरून ट्रेन.. अन्..
तांत्रिक बिघाडामुळे आग; डेल्टा एअर लाइन्सचे स्पष्टीकरण
या घटनेनंतर 'डेल्टा एअर लाइन्स'ने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. "आमच्या ग्राहकांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. इंजिनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली होती," असे कंपनीने स्पष्ट केले आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी प्रवाशांना झालेल्या मनस्तापाबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. संबंधित विमान वाहतूक प्राधिकरणाने या गंभीर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.