US Iran Conflict: इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणशी कोणत्याही प्रकारचा करार करण्यासाठी 'बिनशर्त आत्मसमर्पण' हीच पहिली अट असेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांच्या या विधानामुळे मध्य पूर्वेतील युद्धाला आता एक नवीन आणि अधिक गंभीर वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे.
'ट्रुथ सोशल'वरून ट्रम्प यांचा प्रहार
अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत आपली भूमिका मांडली. त्यांनी लिहिले की, "इराणशी बिनशर्त आत्मसमर्पणाशिवाय कोणताही करार होणार नाही. आम्ही एक महान आणि स्वीकारार्ह नेता निवडू आणि इराणला विनाशाच्या उंबरठ्यावरून परत आणण्यासाठी अथक परिश्रम करू." विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी इराणच्या पुढील सर्वोच्च नेत्याच्या (Supreme Leader) निवड प्रक्रियेत अमेरिकेचा सहभाग असण्याची गरजही अधोरेखित केली आहे, जे इराणच्या अंतर्गत राजकारणात थेट हस्तक्षेपाचे संकेत मानले जात आहेत.
इराणची 'सन्मानाने शांतते'ची साद
दुसरीकडे, इराणने या संघर्षात शांततेची इच्छा व्यक्त केली असली तरी, आपल्या अधिकारांशी तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सोशल मीडियावर मध्यस्थीच्या प्रयत्नांचे स्वागत करताना म्हटले की, "काही देशांनी मध्यस्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की आम्ही प्रदेशात शाश्वत शांततेसाठी वचनबद्ध आहोत, परंतु आमच्या देशाच्या सन्मानाचे आणि अधिकारांचे रक्षण करण्यात आम्हाला कोणताही संकोच नाही." इराणने अमेरिकेच्या दबावापुढे झुकण्यास नकार दिल्याचेच या विधानातून दिसून येते.
हेही वाचा - Trump Tariff Refund : ट्रम्प यांना मोठा झटका! आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा टॅरिफ परत करण्याचा आदेश; कंपन्यांना मिळणार 14.5 लाख कोटी रुपये
मध्य पूर्वेतील पेच वाढला
ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा संपूर्ण प्रदेश युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अमेरिकेने इराणमधील शासन बदल (Regime Change) आणि पूर्ण शरणागतीची भाषा केल्यामुळे राजनैतिक तोडगा निघण्याची शक्यता सध्या धूसर झाली आहे. आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, अमेरिकेची ही कठोर भूमिका इराणला अधिक आक्रमक पवित्रा घेण्यास प्रवृत्त करू शकते, ज्यामुळे जागतिक इंधन पुरवठा आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची भीती आहे.