Nobel Prize 2025 in Literature: साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा 2025 चा नोबेल पुरस्कार यंदा हंगेरियन कादंबरीकार आणि पटकथालेखक लास्झलो क्रॅस्नाहोर्काई यांना जाहीर झाला आहे. स्वीडिश अकादमीने जाहीर केले की, हा पुरस्कार त्यांना त्यांच्या प्रभावशाली आणि दूरदर्शी साहित्यकृतींसाठी, ज्या भीती आणि विनाशाच्या काळातही कलेच्या सामर्थ्याची पुष्टी करतात, या उल्लेखासह प्रदान करण्यात येत आहे. लास्झलो क्रॅस्नाहोर्काई यांना त्यांच्या प्रगल्भ, प्रलयकारी आणि तात्विक लेखनशैलीसाठी 'प्रलयाचा भविष्यवेत्ता' म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या लेखनात जग कोसळत असतानाही सौंदर्य, श्रद्धा आणि जगण्याची जिद्द दिसून येते.
बुकमेकर्सच्या अंदाजानुसार, साहित्याच्या नोबेलसाठी यंदा ऑस्ट्रेलियन लेखक गेराल्ड मुर्नाने यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. मात्र अंतिम निकालात लास्झलो क्रॅस्नाहोर्काई यांनी त्यांना मागे टाकत हा प्रतिष्ठित सन्मान पटकावला. बुकमेकर्सच्या यादीत लास्झलो दुसऱ्या क्रमांकावर (6/1) आणि गेराल्ड मुर्नाने अव्वल (5/1) स्थानी होते. या वर्षीच्या दावेदारांच्या यादीत मेक्सिकोच्या क्रिस्टिना रिवेरा गार्झा, जपानचे हारुकी मुराकामी, रोमानियाचे मिर्सिया कॅटेरेस्कू, अमेरिकेचे थॉमस पिंचॉन आणि चीनचे चान शु यांचा समावेश होता.
हेही वाचा - Jaish-e-Mohammed First Women’s Wing: ऑपरेशन सिंदूरनंतर जैश-ए-मोहम्मदची नवी रणनीती; मसूद अझहरची बहीण पहिल्या महिला ब्रिगेडचे नेतृत्व करणार
लास्झलो क्रॅस्नाहोर्काई यांच्या प्रमुख कादंबऱ्या -
लास्झलो क्रॅस्नाहोर्काई यांच्या प्रमुख कादंबऱ्यांमध्ये सॅटानटांगो, द मेलॅन्कोली ऑफ रेझिस्टन्स आणि बॅरन वेंकहाइमची होमकमिंग यांचा समावेश आहे. त्यांची लेखनशैली आकर्षक असून ती निराशा, विश्वास आणि विडंबन यांच्यात फिरणारी अराजकतेच्या भाषेसारखीच आहे. त्यांच्या कादंबऱ्या त्यांच्या लांबलचक, गुंतागुंतीच्या आणि विचारप्रवर्तक लेखनशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. निराशा आणि विनाशाच्या पार्श्वभूमीवरही त्यांच्या कथांमध्ये मानवी आशा आणि सौंदर्याचे दर्शन घडते.
हेही वाचा - UK PM On Aadhaar System : ब्रिटनमध्येही सुरु होणार आधारसारखी डिजिटल ओळख प्रणाली; पंतप्रधान स्टारमरनं दिली माहिती, म्हणाले...
साहित्यातील पहिला नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला?
पहिला साहित्यातील नोबेल पुरस्कार 1901 मध्ये फ्रेंच कवी सुली प्रुधोम्मे यांना देण्यात आला. तथापी, स्वीडनच्या सेल्मा लेगरलोफ 1909 मध्ये हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. फ्रेंच कवी आणि लेखकांना साहित्यात आजवर सर्वाधिक (16) नोबेल पुरस्कार मिळाले आहेत. तथापी, लिओ टॉल्स्टॉय, व्हर्जिनिया वुल्फ आणि जेम्स जॉइस सारख्या महान लेखकांना कधीही हा सन्मान मिळालेला नाही.