Kim Jong-un Successor : उत्तर कोरियातील सत्तासंघर्षाबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. हुकूमशहा किम जोंग उन यांनी आपला राजकीय वारसदार म्हणून कोणाची निवड केली, यावरून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने (NIS) दावा केला आहे की, किम जोंग उन यांनी त्यांची मुलगी किम जु-ए (Kim Ju-ae) हिला आपला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.
वारसाहक्काची परंपरा कायम राहणार
उत्तर कोरियामध्ये सत्तेचे हस्तांतरण नेहमीच किम कुटुंबात राहिले आहे. किम जोंग-इल यांच्या निधनानंतर किम जोंग-उन यांनी सत्ता हाती घेतली होती. आता तोच वारसा पुढे नेत किम जोंग-उन आपल्या मुलीला सज्ज करत असल्याचे दिसून येत आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय गुप्तचर सेवेने (NIS) अनेक परिस्थितींचे विश्लेषण केल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे. यामध्ये किम जु-ए यांची अधिकृत सरकारी कार्यक्रमांमधील वाढलेली उपस्थिती हे सर्वात मोठे कारण मानले जात आहे.
किम जु-ए यांची वाढती सार्वजनिक उपस्थिती
किम जु-ए यांच्याबद्दल गोपनीयतेमुळे जगात फार कमी माहिती उपलब्ध आहे. मात्र, गेल्या काही काळापासून त्या सातत्याने आपल्या वडिलांसोबत लष्करी आणि राजकीय व्यासपीठावर दिसत आहेत. विशेषतः क्षेपणास्त्र चाचण्यांच्या वेळी त्या किम जोंग उन यांच्यासोबत असतात. अलीकडेच त्यांच्या वडिलांच्या बीजिंग दौऱ्यातही त्या सहभागी झाल्या होत्या, जो त्यांचा पहिला अधिकृत परदेश दौरा मानला जातो. साधारण 13 वर्षांच्या असलेल्या किम जु-ए पहिल्यांदा 2022 मध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या तपासणीदरम्यान जगासमोर आल्या होत्या.
फेब्रुवारीतील पक्ष परिषद ठरणार निर्णायक
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस उत्तर कोरियाची महत्त्वपूर्ण 'पक्ष परिषद' (Party Congress) पार पडणार आहे. हा कार्यक्रम दर 5 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो. या परिषदेत किम जु-ए यांना अधिकृत स्थान मिळते का, यावर दक्षिण कोरियाची गुप्तचर यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहे. या परिषदेतून उत्तर कोरियाच्या आगामी पाच वर्षांच्या परराष्ट्र धोरणासोबतच आण्विक आणि युद्ध योजनांबाबतही महत्त्वाचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Defence Rafale Deal: शत्रू राष्ट्रांवर भारताचा एअर स्ट्राईक होणार अधिक भयानक, 114 नव्या राफेल विमानांच्या खरेदीला मंजुरी
मोठ्या मुलाबाबत संभ्रम कायम
किम जोंग उन आणि त्यांची पत्नी री सोल जू यांची किम जु-ए ही एकमेव ज्ञात अपत्य आहे. मात्र, दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थांचा असाही कयास आहे की किम जोंग उन यांना एक मोठा मुलगा देखील आहे. परंतु, या मुलाला आजवर उत्तर कोरियाच्या माध्यमांनी कधीही जगासमोर आणलेले नाही किंवा सरकारने त्याला अधिकृत वारस म्हणून स्वीकारल्याचे संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे सध्यातरी किम जु-ए याच उत्तर कोरियाच्या पुढील सर्वेसर्वा असतील, असे चित्र दिसत आहे.