Hafiz Saeed Lashkar-e-Taiba Internal Conflict : दहशतवादाचा कारखाना मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानात आता अंतर्गत संघर्षाचा भडका उडाला आहे. भारताच्या विरोधात कारवाया करणारी 'लष्कर-ए-तैयबा' (LeT) ही प्रमुख दहशतवादी संघटना सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटनेचा प्रमुख हाफिज सईद आणि त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. या अंतर्गत बंडाळीमुळे पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेचे आणि ISI च्या रणनीतीचे गणित पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे.
'ऑपरेशन सिंदूर': भारतीय लष्कराचा निर्णायक प्रहार
या अंतर्गत वादाच्या केंद्रस्थानी भारतीय लष्कराने राबवलेली 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) ही अत्यंत गोपनीय आणि प्रभावी मोहीम असल्याचे बोलले जात आहे. एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 7 मे 2025 रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले होते. या कारवाईत लष्कर-ए-तैयबाचे पायाभूत जाळे उद्ध्वस्त झाले असून, अनेक वरिष्ठ कमांडर मारले गेले आहेत. या धक्क्यातून सावरणे संघटनेला कठीण जात असून, पाकिस्तानी लष्कर आपल्याला संरक्षण देऊ शकले नाही, अशी भावना दहशतवाद्यांमध्ये निर्माण झाली आहे.
स्वकीयांशी लढण्यास दहशतवाद्यांचा नकार
पाकिस्तानी लष्कराने लष्कर-ए-तैयबाला बलोच नॅशनल आर्मी आणि तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) विरुद्ध लढण्याचे आदेश दिले होते. मात्र, संघटनेतील एका गटाने याला कडाडून विरोध केला आहे. "चीन आणि पाश्चात्त्य देशांच्या हितासाठी आम्ही आमच्याच लोकांशी का लढायचे?" असा सवाल दहशतवाद्यांनी उपस्थित केला आहे. अफगाणिस्तानातील तालिबान समर्थकांशी असलेले जुने संबंध आणि पाकिस्तान सरकारची बदलती भूमिका यामुळे संघटनेत दोन स्पष्ट गट पडले आहेत, ज्यामुळे ISI चे या संघटनेवरील नियंत्रण आता कमकुवत होत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - Devendra Fadnavis In Davos : 'तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर यशस्वीपणे...'; दावोसमधून मुख्यमंत्र्यांनी मांडला महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा
कमांडरचा व्हिडिओ व्हायरल; सरकारवर गंभीर आरोप
लष्कर-ए-तैयबाचा कमांडर मोहम्मद अशफाक राणा याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने थेट पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "पाकिस्तानी सरकारने केवळ आमचा वापर केला आणि संकटाच्या वेळी आम्हाला वाऱ्यावर सोडले," असा आरोप त्याने केला आहे. तसेच, पाकिस्तानवरील कर्जाच्या डोंगराचा उल्लेख करत त्याने भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांमुळे देशाची ही अवस्था झाल्याचे खडे बोल सुनावले आहेत.
पाकिस्तानसमोर दहशतवादाचे नवे आव्हान
हाफिज सईद गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक जीवनापासून आणि संघटनेच्या कामापासून दूर आहे. त्याच्या अनुपस्थितीत संघटनेत निर्माण झालेली ही पोकळी पाकिस्तानसाठी घातक ठरू शकते. जर नाराज झालेले कट्टर दहशतवादी TTP सारख्या संघटनांना जाऊन मिळाले, तर पाकिस्तान स्वतःच पेरलेल्या दहशतवादाच्या जाळ्यात अडकेल. दक्षिण आशियातील एकूणच सुरक्षेच्या दृष्टीने ही मोठी घडामोड असून, भारतीय सुरक्षा यंत्रणा या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
हेही वाचा - Vladimir Putin : ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं; रशियाच्या विमानात पुतिन यांनी सजवला 'भारतीय स्वाभिमान'; नेमकं असं केलं तरी काय?