Friday, March 13, 2026 10:21:13 PM

Russia WhatsApp Ban: रशियाच्या त्या निर्णयामुळे मेटासमोर मोठे आव्हान; पुतिन सरकारच्या निर्णयाने जागतिक टेक क्षेत्रात खळबळ

पुतिन सरकारच्या नव्या डिजिटल धोरणामुळे मेटाला मोठा झटका बसला असून कोट्यवधी वापरकर्त्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

russia whatsapp ban रशियाच्या त्या निर्णयामुळे मेटासमोर मोठे आव्हान पुतिन सरकारच्या निर्णयाने जागतिक टेक क्षेत्रात खळबळ

Russia WhatsApp Ban: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी परदेशी तंत्रज्ञान कंपन्यांवर कठोर भूमिका घेत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. रशियात लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सॲप या मेसेजिंग अ‍ॅपवर कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या हालचालींना वेग आला असून, यामुळे ‘मेटा’ कंपनीला मोठा धक्का बसला आहे. हा निर्णय रशियाच्या नव्या डिजिटल धोरणाचा भाग मानला जात असून, देशांतर्गत अ‍ॅप्सना प्राधान्य देण्याच्या दिशेने टाकलेले ठाम पाऊल असल्याचे बोलले जात आहे.

रशियन प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपवर निर्बंध घालण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा स्वतः कंपनीने केला आहे. त्यानंतर आता व्हॉट्सॲपचा प्रवेश मर्यादित करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. रशियाच्या इंटरनेट नियामक संस्थेने व्हॉट्सॲपला अधिकृत ऑनलाइन नोंदणी यादीतून वगळले असून, त्यामुळे अनेक वापरकर्त्यांना अ‍ॅप वापरण्यात अडचणी येत आहेत. काही ठिकाणी अ‍ॅप मंद गतीने चालत आहे, तर काही ठिकाणी पूर्णपणे अकार्यक्षम झाले आहे.

सध्या रशियात १० कोटींपेक्षा अधिक नागरिक व्हॉट्सॲपचा वापर करतात. वैयक्तिक संवाद, कुटुंबीयांशी संपर्क, ग्रुप चॅट, फोटो-व्हिडिओ शेअरिंग तसेच व्यावसायिक व्यवहारांसाठी हे अ‍ॅप अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे व्हॉट्सॲपवर पूर्ण बंदी आल्यास सामान्य नागरिकांपासून ते छोट्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रशियन सरकार स्थानिक डिजिटल अ‍ॅप ‘MAX’ ला प्रोत्साहन देण्याच्या तयारीत आहे. परदेशी अ‍ॅप्सवर निर्बंध घालून नागरिकांना स्वदेशी पर्यायांकडे वळवणे, हा या धोरणाचा मुख्य उद्देश असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याआधीही रशियाने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बंदी घातली आहे, तसेच यूट्यूबच्या सेवांवर मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे व्हॉट्सॲपवरील कारवाई ही अचानक नसून, दीर्घकालीन धोरणाचा भाग असल्याचे स्पष्ट होते.

व्हॉट्सॲपकडून या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. कंपनीने आपल्या निवेदनात सांगितले की, रशियातील वापरकर्ते एकमेकांशी जोडले राहावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मात्र, रशियन कायदे आणि डेटा सुरक्षेशी संबंधित नियम पाळल्याशिवाय अ‍ॅपला देशात सुरू ठेवणे कठीण होणार आहे.

रशियन सरकारने यापूर्वीही व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या कॉल सेवांवर तात्पुरती बंदी घातली होती. तसेच २०२५ मध्ये डेटा शेअरिंग आणि गोपनीयतेच्या मुद्द्यांवर इशारे देण्यात आले होते. त्यामुळे मेटाने रशियन नियमांचे पालन न केल्यास व्हॉट्सॲपचे पुनरागमन अशक्य ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकूणच, व्हॉट्सॲपवरील संभाव्य कायमस्वरूपी बंदी हा केवळ तंत्रज्ञानाचा मुद्दा नसून, तो आंतरराष्ट्रीय राजकारण, डिजिटल स्वायत्तता आणि अमेरिकन कंपन्यांविरोधातील रशियाच्या भूमिकेचे प्रतीक मानला जात आहे.


सम्बन्धित सामग्री