Thursday, February 12, 2026 03:52:22 AM

Spain Train Accident: स्पेनमध्ये भीषण रेल्वे अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेनची जोरदार धडक, 21 जणांचा मृत्यू

दक्षिण स्पेनमधील कॉर्डोबा प्रांतात हाय-स्पीड ट्रेनच्या भीषण धडकेत 21 जणांचा मृत्यू तर 100 जण जखमी झाले.

spain train accident स्पेनमध्ये भीषण रेल्वे अपघात दोन हाय-स्पीड ट्रेनची जोरदार धडक 21 जणांचा मृत्यू

Spain train accident: दक्षिण स्पेनमधील कॉर्डोबा प्रांतात रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण युरोप हादरला आहे. आदामुज (Adamuez) स्थानकाजवळ दोन हाय-स्पीड ट्रेन एकमेकांवर आदळल्याने किमान 21 जणांचा मृत्यू झाला असून 100 प्रवासी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला, तर अपघातानंतरचे थरारक दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगा ते माद्रिद दरम्यान धावणारी आयरियो कंपनीची हाय-स्पीड ट्रेन अचानक रुळावरून घसरली. नियंत्रण सुटल्याने ही ट्रेन शेजारच्या ट्रॅकवर गेली आणि त्या वेळी माद्रिदहून हुएल्वाकडे जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनला जोरदार धडक बसली. धडकेचा आवाज इतका तीव्र होता की काही डबे पूर्णपणे उलटले, तर काही डब्यांचे अक्षरशः लोखंडाचे पत्रे वाकडे झाले.

अपघातानंतर ट्रेनमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक प्रवासी आत अडकले होते. आपला जीव वाचवण्यासाठी काही जणांनी आपत्कालीन हॅमरच्या मदतीने काचा फोडल्या आणि खिडक्यांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जखमी प्रवासी खिडक्यांमधून रांगत बाहेर येताना दिसत आहेत. या दृश्यांनी पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

आंदालुसिया प्रांताचे प्रमुख जुआनमा मोरेनो यांनी या अपघाताबाबत माहिती देताना सांगितले की, जखमींपैकी किमान १५ जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची तीव्रता पाहता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. ढिगाऱ्याखाली अडकलेले प्रवासी शोधण्यासाठी अवजड यंत्रसामग्रीचा वापर केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हा अपघात रविवारी सायंकाळी सुमारे ५.४० वाजता (स्पेन वेळेनुसार) आदामुज स्थानकाजवळ घडला. स्पेनच्या रेल्वे पायाभूत सुविधा व्यवस्थापन संस्था ‘एडीआयएफ’ने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही ट्रेन रुळावरून घसरल्या असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनास्थळी तातडीने आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलिस दाखल झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

या दुर्घटनेनंतर माद्रिद आणि आंदालुसिया दरम्यानच्या हाय-स्पीड रेल्वे सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या आहेत. मात्र माद्रिद, टोलेडो, सिऊदाद रिअल आणि पुर्तोयानो दरम्यानच्या काही व्यावसायिक रेल्वे सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. आंदालुसिया आपत्कालीन सेवांनी सोशल मीडियावरून सर्व रेल्वे वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आल्याची पुष्टी केली आहे.


सम्बन्धित सामग्री