Friday, February 13, 2026 07:12:05 PM

Palak Paneer Controversy : पालक पनीरचा वास येतो... भारतीय जेवणाचा अपमान करणं पडलं महागात; अमेरिकन विद्यापीठाला द्यावी लागली 1.8 कोटींची नुकसानभरपाई

'पालक पनीर' गरम केल्यामुळे वर्णद्वेषाचा सामना करावा लागलेल्या आदित्य प्रकाश आणि उर्मी भट्टाचार्य या दाम्पत्याने विद्यापीठाकडून 1.8 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळवली आहे.

palak paneer controversy  पालक पनीरचा वास येतो भारतीय जेवणाचा अपमान करणं पडलं महागात अमेरिकन विद्यापीठाला द्यावी लागली 18 कोटींची नुकसानभरपाई

Palak Paneer Controversy : परदेशात आपल्या खाद्यसंस्कृतीवरून होणाऱ्या भेदभावाविरुद्ध दोन भारतीय विद्यार्थ्यांनी दिलेल्या कायदेशीर लढाईला मोठे यश आले आहे. अमेरिकेतील 'युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो बोल्डर'मध्ये केवळ 'पालक पनीर' गरम केल्यामुळे वर्णद्वेषाचा सामना करावा लागलेल्या आदित्य प्रकाश आणि उर्मी भट्टाचार्य या दाम्पत्याने विद्यापीठाकडून 1.8 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळवली आहे.

नेमका वाद काय होता?

सप्टेंबर 2023 मध्ये पीएचडीचे विद्यार्थी असलेले आदित्य प्रकाश विद्यापीठाच्या विभागात आपले जेवण (पालक पनीर) गरम करत होते. यावेळी एका कर्मचाऱ्याने जेवणाच्या 'वासाचा' बहाणा करून त्यांना रोखले. आदित्य यांनी ही बाब सामान्य असल्याचे सांगूनही वादाला सुरुवात झाली. पुढे हा वाद इतका विकोपाला गेला की, विद्यापीठाने या दाम्पत्यावरच सूडबुद्धीने कारवाई करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा - Train Accident: धावत्या हायस्पीड रेल्वेवर कोसळली क्रेन... 22 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

विद्यापीठाची 'सूडबुद्धी' आणि धक्कादायक आरोप

आपल्यासोबत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आदित्य आणि उर्मी यांनी आवाज उठवताच विद्यापीठाने त्यांच्यावरच ताशेरे ओढले. पालक पनीरच्या घटनेनंतर दोन दिवसांनी पुन्हा भारतीय जेवण केल्यामुळे या दाम्पत्यावर चक्क दंगल भडकवल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला. तसेच उर्मी भट्टाचार्य यांना कोणतीही नोटीस न देता त्यांच्या 'टीचिंग असिस्टंट' पदावरून हटवण्यात आले. तसेच वरिष्ठ प्राध्यापकांकडून आदित्य यांना वारंवार धमकावण्यात आले.

हेही वाचा - Donald Trump : ट्रम्पचा संयम सुटला! कामगारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अश्लील हावभाव करत शिवीगाळ

कायदेशीर विजय आणि तडजोड

अखेर या अन्यायाविरुद्ध हे दाम्पत्य कोलोरॅडोच्या जिल्हा न्यायालयात गेले. दोन वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर सप्टेंबर 2025 मध्ये विद्यापीठाने नमती भूमिका घेतली. तडजोडीनुसार, विद्यापीठाला या दोघांना 1.8 कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, त्यांना त्यांची 'मास्टर्स' पदवी बहाल केली जाणार आहे. मात्र, न्यायालयाच्या अटीनुसार, आता हे दोघे भविष्यात या विद्यापीठात शिक्षण किंवा नोकरी करू शकणार नाहीत.

स्वाभिमानासाठी लढा दिला 

माझ्या त्वचेचा रंग किंवा भारतीय उच्चार यामुळे माझा स्वाभिमान कमी करण्याचा प्रयत्न झाला, पण मी झुकणार नाही, अशी प्रतिक्रिया उर्मी भट्टाचार्य यांनी भारतात परतल्यावर सोशल मीडियावर दिली. भारतीय खाद्यसंस्कृतीचा हा विजय सध्या जगभरातील नेटकऱ्यांकडून साजरा केला जात आहे.
 


सम्बन्धित सामग्री