रशिया: रशियातील Ufa State Medical University च्या हॉस्टेलमध्ये झालेल्या चाकूहल्ल्यात चार भारतीय विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. बश्कोर्तोस्तान प्रजासत्ताकातील (Republic of Bashkortostan) या विद्यापीठाच्या परदेशी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमधील स्पोर्ट्स हॉलमध्ये ही घटना घडली. एकूण आठ जण जखमी झाले असून, मध्यस्थी करताना दोन पोलिस अधिकाऱ्यांनाही दुखापत झाली आहे.
रशियातील भारतीय दूतावासाने (Embassy of India in Russia) शनिवारी उशिरा रात्री माहिती देत सांगितले की, जखमींमध्ये चार भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दूतावासाने स्पष्ट केले की ते स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत आणि कझान येथील कॉन्सुलेटमधील अधिकारी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ऊफा येथे रवाना होत आहेत. रशियाच्या गृह मंत्रालयानुसार, आरोपीने अटकेपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात विद्यार्थ्यांवर तसेच दोन पोलिस अधिकाऱ्यांवर चाकूने हल्ला केला.
हेही वाचा: T20 World Cup: गोलंदाजांची धार अन् सूर्याचा प्रहार; अमेरिकेचा 29 धावांनी पराभव करत वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने रोवला विजयाचा झेंडा
Ministry of Internal Affairs of Russia च्या प्रवक्त्या मेजर जनरल इरीना वोल्का यांनी सांगितले की, “आरोपीने अटकेला विरोध केला आणि त्यादरम्यान दोन पोलिस अधिकाऱ्यांना चाकू मारला. संशयिताने स्वतःलाही शारीरिक इजा पोहोचवली.” रशियाच्या संघीय आरोग्य मंत्रालयाने (Federal Health Ministry) कळवले की चार जखमींवर उपचार सुरू असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. आरोपी हा 15 वर्षांचा मुलगा असल्याचे समोर आले असून, त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, आरोपी एका बंदी घातलेल्या नव-नाझी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. तथापि, या संदर्भातील तपास अद्याप सुरू आहे आणि अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा आहे. या घटनेने परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
दरम्यान, रशियन प्रशासनाने परिसरात सुरक्षा वाढवली असून, तपास यंत्रणा घटनास्थळावरील पुरावे गोळा करत आहेत. भारतीय दूतावासाने जखमी विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असून, आवश्यक ती सर्व मदत पुरवली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा: Maharashtra Weather Update: हवामान खात्याचा मोठा इशारा; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे सावट? जाणून घ्या पुढील 48 तास कसे असतील