US Military Attack on Submarine: अमेरिकन सैन्याने कॅरिबियन समुद्रात एका ड्रग्ज वाहून नेणाऱ्या पाणबुडीला लक्ष्य करून नष्ट केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर या कारवाईची माहिती दिली. पाणबुडीमध्ये फेंटानिल आणि इतर प्रतिबंधित ड्रग्ज असल्याचे सांगितले जात आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, ही पाणबुडी अमेरिकेकडे येत होती आणि तिचा नाश केल्यामुळे हजारो अमेरिकन नागरिकांचे जीव वाचले.
ट्रम्प म्हणाले, 'ड्रग्ज वाहून नेणारी मोठी पाणबुडी नष्ट करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ही कारवाई ड्रग्ज तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मार्गांवर झाली. दोन दहशतवादी ठार झाले, तर इतर दोघांना इक्वेडोर आणि कोलंबियाला पाठवले जात आहे.' त्यांनी असा दावा केला की, 'जर ही पाणबुडी अमेरिकेत पोहोचली असती, तर किमान 25 हजार नागरिकांचा मृत्यू झाला असता.'
ही कारवाई सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झालेल्या अमेरिकन लष्करी मोहीमेचा भाग आहे, ज्याचा उद्देश लॅटिन अमेरिकेतून अमेरिकेत होणाऱ्या ड्रग्जच्या पुरवठ्यावर नियंत्रण मिळवणे हा आहे. आतापर्यंत अमेरिकन सैन्याने कॅरिबियन समुद्रात सहा जहाजे किंवा अर्ध-पाणबुड्या नष्ट केल्याचे अहवालात म्हटले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, ही कारवाई ड्रग्ज नेटवर्कवर निर्णायक हल्ला आहे.
हेही वाचा - Gaza Peace Talks: गाझा युद्धबंदीला मोठा धोका? हमास नागरिकांवर हल्ल्याच्या तयारीत; अमेरिकेचा कडक इशारा, “युद्धविराम मोडला तर…”
तथापि, या कारवाईवर आंतरराष्ट्रीय कायदा तज्ज्ञ आणि मानवाधिकार संघटनांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्पष्ट पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रियेविना केलेली अशा प्रकारची लष्करी कारवाई आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन ठरू शकते, असे त्यांचे मत आहे. सुरक्षा विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, 'जरी हे लोक ड्रग्ज तस्कर असले तरी त्यांना न्यायालयीन प्रक्रियेत शिक्षा व्हायला हवी होती, समुद्रात ठार करण्यात नव्हे.'
हेही वाचा - USA No Kings Protest: अमेरिकेत ‘नो किंग्ज’ आंदोलनाने ट्रम्प प्रशासनाला आव्हान; ५० राज्यांत नागरिक रस्त्यावर
दरम्यान, ही पाणबुडी कोलंबिया किंवा व्हेनेझुएलातील गुप्त शिपयार्डमधून निघाली असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दक्षिण अमेरिकेतून मध्य अमेरिकेत कोकेन किंवा फेंटानिल वाहून नेण्यासाठी अशा प्रकारच्या सेमी-पाणबुड्यांचा वापर केला जातो. फेंटानिल हे अत्यंत शक्तिशाली सिंथेटिक ड्रग असून, गेल्या काही वर्षांत अमेरिकेत याच्या अतिसेवनामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाने याला राष्ट्रीय सुरक्षेचा धोका मानत ड्रग्ज तस्करांविरुद्ध थेट लष्करी कारवाई करण्याचे धोरण अवलंबले.