जगप्रसिद्ध बुद्धिबळपटू डॅनियल नारोडितस्की याचे वयाच्या 29व्या वर्षी आकस्मिक निधन झाले आहे. त्याच्या कुटुंबाने सोमवारी या दुर्दैवी घटनेची अधिकृत घोषणा केली. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील बे एरियामधील रहिवासी असलेला नारोडितस्की हे बुद्धिबळ विश्वातील एक नावाजलेले आणि लोकप्रिय नाव होते. उत्कृष्ट खेळ, प्रभावी विश्लेषण आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानामुळे तो बुद्धिबळ प्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण करून गेला आहे.
स्टॅनफर्ड विद्यापीठातून इतिहास विषयात पदवी प्राप्त केलेल्या डॅनियलने केवळ 18 व्या वर्षी ग्रँडमास्टर हा किताब मिळवला होता. अलीकडेच त्याने अमेरिकन नॅशनल ब्लिट्झ चॅम्पियनशिप जिंकून आपली चमक कायम राखली होती. त्याच्या कुटुंबाच्या निवेदनात म्हटले आहे, “डॅनियल हा केवळ एक प्रतिभावान खेळाडू नव्हता, तर एक प्रेमळ, प्रेरणादायी आणि सर्वांच्या मनात स्थान मिळवलेला व्यक्ती होता.”
सॅन माटेओ येथे जन्मलेला डॅनियल याने लहानपणापासूनच बुद्धिबळाची आवड जोपासली होती. त्याने उत्तरेकडील कॅलिफोर्निया K-12 बुद्धिबळ स्पर्धेत सर्वात कमी वयात विजेतेपद मिळवले. त्यानंतर 2007 मध्ये त्यांनी वर्ल्ड यूथ चेस चॅम्पियनशिपच्या अंडर-12 विभागात सुवर्णपदक पटकावले आणि 2013 मध्ये यूएस ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकली.
हेही वाचा: H1B Visa: भारतीय तंत्रज्ञ आणि विद्यार्थ्यांसाठी आनंदाची वार्ता! अमेरिकेने H-1B व्हिसाच्या शुल्कवाढीच्या अटी केल्या शिथील
2013 मध्ये ग्रँडमास्टरचा किताब मिळवल्यानंतर 2014 मध्ये त्याला सॅमफर्ड चेस फेलोशिप हा प्रतिष्ठित सन्मान मिळाला. त्याचा खेळ नेहमीच सातत्यपूर्ण राहिला, ज्यामुळे तो जगातील टॉप 200 खेळाडूंपैकी एक आणि अमेरिकेतील टॉप 15 क्लासिकल चेस खेळाडूंमध्ये गणला जात होता. 2025 मध्ये त्याच्या FIDE ब्लिट्झ रेटिंगने 2732 गुण त्याला मिळाले , ज्यामुळे त्याला जगात 18 वे आणि अमेरिकेत 6 वे स्थान मिळाले.
त्याच्या निधनानंतर जागतिक बुद्धिबळ समुदायाने शोक व्यक्त केला आहे. हिकारू नाकामुरा यांनी लिहिलं, “हा संपूर्ण चेस जगासाठी एक मोठा धक्का आहे.” भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी या घटनेला “अविश्वसनीय आणि दु:खद” म्हटलं, तर प्रशिक्षक आर. बी. रमेश यांनी श्रद्धांजली व्यक्त करत म्हटलं, “तो अत्यंत नम्र, प्रतिभावान आणि संवेदनशील व्यक्ती होता. कोविड काळात त्याच्यासोबत काम करण्याचा सन्मान मला लाभला. आम्ही सर्व त्याची खूप आठवण ठेवू.”
नारोडितस्की यांनी ऑनलाइन विश्वातही बुद्धिबळाची नवी पिढी घडवली. त्याचे YouTube वर 4.8 लाख सदस्य होते. या YouTube चॅनेलवर तो बुद्धिबळाचे सखोल विश्लेषण आणि प्रेरणादायी व्हिडिओ सादर करत असत. त्याची शैली शांत, नेमकी आणि विचारपूर्ण असल्याने तो जागतिक स्तरावरील चाहत्यांचा आवडता झाला होता.
डॅनियल नारोडितस्की याच्या निधनाने बुद्धिबळ क्षेत्रातील एक तेजस्वी आणि प्रेरणादायी तारा निखळला आहे. त्याच्या स्मृतीत बुद्धिबळ जगत एकच गोष्ट सांगते. डॅनियलने खेळात प्रेम, नम्रता आणि प्रेरणेची शिदोरी दिली, जी कायम स्मरणात राहील.
हेही वाचा: Toll Gate Open : दिवाळी बोनस कमी मिळाल्याने टोल कर्मचाऱ्यांचा संताप; हजारो गाड्या शुल्काशिवाय सोडल्या! कंपनीला लाखोंचा फटका