Thu. Sep 29th, 2022

डॉ. आंबेडकरांना पत्रातून अभिवादन

काँग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पत्र लिहिले आहे. आज १४ एप्रिल म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३१वी जयंती आहे. याप्रसंगी त्यांनी थेट डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनाच पत्र लिहीत त्यांच्या विचारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

यशोमती ठाकूर पत्रात काय म्हणाल्या?

बाबासाहेब आज तुमची खूप आठवण येत आहे. आज तुम्ही इथे हवे होतात असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. आपण आम्हाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला , हाच मूलमंत्र घेऊन आम्ही मार्गक्रमण करीत आहोत. आपण जगातील सर्वोत्तम राज्यघटना आणि भक्कम लोकशाही तयार केलीत याबद्दल त्यांनी पत्रद्वात्रे कृतज्ञता व्यक्त केली. तुमच्या दूरदृष्टीपणामुळेच आज आपला देश अखंड , एकसंध आणि सार्वभौम राहिला असंही त्या म्हणाल्या. दामोदर नदी खोरे, सोनार नदी खोरे प्रकल्प , हिराकुंड धरण प्रकल्प , रिजर्व बँक या संस्थांच्या स्थापनेमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल ही ठाकूर यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप हे त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून कळते , तसेच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे… ही बाबासाहेबांची वाक्य ही त्यांनी या पत्रातून अधोरेखित केली आहेत.तर देशापुढे धर्मांधता , जातीयता तसेच राज्यघटनेला धोक्यात आणणारे सत्ताधीश आहेत असं म्हणत त्याला आम्ही लढा देऊ असंही त्या या पत्रात म्हणाल्या आहेत. आपल्या नावाचा आणि संविधानाचा केवळ भाषणकरता वापर करणाऱ्या धर्मांध प्रवृत्तींना समतेची मूल्ये शिकवण्यासाठी आपण आमच्यात हवे होतात, मात्र तुम्ही दिलेल्या निडर विचारातून आणि पोलादी राज्यघटनेतून तुम्ही आमच्यातच आहेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.